(फलटण/प्रतिनिधी) : फलटण शहरात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभाग व फलटण शहर पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली. या कारवाईत ४१ हजार १८० रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ जून २०२६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास नरसोबानगर, कोळकी (ता. फलटण) येथील किरण शशिकांत दोशी यांच्या घरामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली आप्पासाहेब खापणे यांनी फलटण शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला.
छाप्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची उत्पादने आढळून आली. यामध्ये एकूण ४१,१८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईनंतर किरण शशिकांत दोशी यांच्यासह संबंधित उत्पादनांच्या उत्पादक, मालक, भागीदार व संचालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून किरण दोशी यांना अटक करण्यात आली आहे.
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे हे करीत आहेत.
Back to top button