(फलटण /प्रतिनिधी) – महिलांचे दुग्ध व्यवसायातील सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार भारतातील नेदरलँड्सच्या राजदूत Marisa Gerards (मा. एच. ई. मारिसा जेरार्ड्स) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना संस्थेच्या संचालिका सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, अजयसिंहराजे नाईक निंबाळकर, श्री. धर्मेंद्र भल्ला तसेच डॉ. शांताराम गायकवाड यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
यावेळी गोविंद फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, हा पुरस्कार केवळ संस्थेचाच नव्हे तर सर्व सहकारी, कार्यकर्ते, लाभार्थी महिला आणि हितचिंतकांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान आहे. या गौरवामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने आणि समर्पणाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
संस्थेने या यशासाठी सर्वांचे प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. हा सन्मान ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
Back to top button