देश विदेश

“आम्हीच ते कॉक्रोच!” धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा आक्रमक आवाज

(माण/ प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण देशभर चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. धुळदेव ग्रामपंचायतीच्या आज पार पडलेल्या ग्रामसभेत सचिन शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे पोस्टर लावत ग्रामसभेत आक्रमकपणे विविध प्रश्न उपस्थित केले.

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मे २०२६ मधील एका सुनावणीदरम्यान काही बेरोजगार तरुण सोशल मीडिया आणि RTI च्या माध्यमातून व्यवस्था खराब करतात, तसेच ते “झुरळांसारखे” असल्याचे विधान केल्याचा आरोप झाला होता.

या विधानाच्या निषेधार्थ अभिजीत दिपके या तरुणाने ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही व्यंगात्मक मोहीम सुरू केली. सोशल मीडियावर या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो तरुण त्यात सहभागी होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर धुळदेव ग्रामसभेतही या आंदोलनाची झलक पाहायला मिळाली. सचिन शिंगाडे यांनी ग्रामसभेत गावातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित करत लक्ष वेधले. त्यांच्या या भूमिकेमुळे ग्रामसभेत काही काळ चांगलीच चर्चा रंगली.

सचिन शिंगाडे हे धुळदेव गावचे रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या विकासासाठी सक्रियपणे काम करत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक प्रश्न सातत्याने मांडले आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून ते पत्रकारिता करत असून सोशल मीडियावर त्यांचे तब्बल चार ते पाच लाख फॉलोवर्स आहेत.

विशेष म्हणजे, त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या मोहिमेला पाठिंबा दिल्यानंतर अनेक तरुण या आंदोलनाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे. माण तालुक्यात आता ही मोहीम आणखी वेगाने पसरते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button