(फलटण /प्रतिनिधी) -फलटण शहरातील गजानन चौक परिसरात गेली अनेक दशके दिमाखात उभे असलेले ५० वर्षांहून अधिक जुने शिरीष वृक्ष आज शहराच्या पर्यावरणीय वारशाचे प्रतीक बनले आहेत.
या ऐतिहासिक व पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण वृक्षांच्या संरक्षणासाठी नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्या वतीने आज प्रांत अधिकारी, फलटण यांना निवेदन सादर करण्यात आले.
पालखी मार्गावरील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे या वृक्षांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले असून, वृक्षतोड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पक्षी निरीक्षक तसेच स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. गजानन चौकातील हे वृक्ष केवळ झाडे नसून, फलटण शहराच्या नैसर्गिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे नागरिकांचे मत आहे.
शिरीष वृक्ष त्यांच्या विस्तीर्ण छायेसाठी ओळखले जातात. या वृक्षांनी अनेक वर्षांपासून हजारो नागरिकांना उन्हाळ्यात थंडावा, सावली आणि शुद्ध हवा दिली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असताना अशा मोठ्या वृक्षांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. हे वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्रदूषण कमी करण्यास मदत करतात तसेच परिसरातील पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवण्यात मोलाची भूमिका बजावतात.विशेष म्हणजे या वृक्षांवर House Crow व Jungle Crow या पक्ष्यांची शेकडो घरटी आहेत. तसेच Spotted Owlet (ठिपकेदार घुबड) आणि Barn Owl (घुबडाची दुर्मिळ प्रजाती) यांसारखे पक्षी देखील या वृक्षांमध्ये वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे वृक्ष स्थानिक पक्षीजीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे अधिवास ठरत आहेत. जर वृक्षतोड झाली तर केवळ हिरवाईच नष्ट होणार नाही, तर अनेक पक्ष्यांचे निवासस्थान उद्ध्वस्त होऊन स्थानिक जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी चिंता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
निवेदनामध्ये प्रशासनाला विकासकामे करताना पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्त्व देण्याचे आवाहन करण्यात आले. रस्ता रुंदीकरणासाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार करावा, आवश्यक असल्यास आराखड्यात बदल करावा आणि वृक्षांची तोड टाळण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच कामादरम्यान वृक्षांच्या मुळांना कोणतीही हानी होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याची विनंतीही करण्यात आली.
संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “विकास हा आवश्यक आहेच, मात्र तो पर्यावरणाच्या हानीच्या किंमतीवर होऊ नये. आज ज्या वृक्षांनी अनेक पिढ्यांना सावली व स्वच्छ हवा दिली, त्यांचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
यावेळी शहरातील अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक उपस्थित होते. त्यांनीही वृक्ष संरक्षण मोहिमेला जाहीर पाठिंबा देत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली. सोशल मीडियावरही या विषयाला मोठा प्रतिसाद मिळत असून “वृक्ष वाचवा – पर्यावरण वाचवा” हा संदेश मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून प्रसारित केला जात आहे.
फलटण शहराच्या पर्यावरणीय वारशाचे प्रतीक ठरलेल्या या ऐतिहासिक शिरीष वृक्षांचे संरक्षण व्हावे आणि विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण व्हावा, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास काय कामाचा पर्यावरण टिकले तरच तुम्ही आम्ही टिकणार आहोत त्यामुळे सदरच्या झाडांना कसल्याही परिस्थितीत हानी न पोचविता प्रशासनाने काही करायचे आहेत हे करावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Back to top button