ताज्या घडामोडी

ऊस उत्पादक, कामगार आणि ठेकेदारांचे हित जपल्याशिवाय कारखाने टिकणार नाहीत- श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

(फलटण/ प्रतिनिधी): साखर कारखान्यांना फायदा व्हावा ही अपेक्षा नाही, मात्र ऊसाला स्पर्धात्मक दर , कामगारांना योग्य वेतन, बोनस व अन्य सवलती आणि तोडणी वाहतूक ठेकेदारांना त्यांचा मोबदला या सर्व बाबी वेळेवर मिळाल्या पाहिजेत, त्यावरच साखर कारखान्यांची यशस्विता अवलंबून असून आज साखरेला योग्य दर मिळत नसल्याने ही संपूर्ण यंत्रणाच संकटात सापडल्याने साखर उद्योगा समोर मोठी समस्या उभी ठाकली असल्याचे किंबहुना साखर कारखाने तोट्यात चालवावे लागत असल्याचे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
३५ ते ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर कारखान्याच्या विविध विभागातील १४ कामगार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या कामकाजाबद्दल कौतुक व निरोप समारंभाचे आयोजन साखर कामगार युनियनच्या माध्यमातून श्रीराम कारखान्याच्या प्रांगणात करण्यात आले होते, यावेळी अध्यक्ष स्थानावरुन मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

यावेळी श्रीरामचे विद्यमान चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले व सर्व संचालक मंडळ आणि साखर कामगार युनियनचे पदाधिकारी प्रामुख्याने प्रेमजीत काटे, नामदेवराव तथा आप्पासाहेब नाळे, पंढरीनाथ ढोले, प्रदीप शिंदे, मुन्नाभाई शेख यांच्यासह सेवानिवृत्त होत असलेले प्रेमजीत प्रभाकर काटे (इलेक्ट्रिकल खाते), नामदेव विठ्ठल नाळे (डीएम प्लांट ऑपरेटर), पंढरीनाथ ढोले (शेती खाते), विठ्ठल शिंदे, भानुदास रणदिवे (केमिकल खाते), मारुती ढोले (बाग खाते), दिलीप धुमाळ, शांतीलाल रणदिवे (इंजिनीरिंग खाते) रवि जाधव (वे-ब्रिज शेती), संपत ननवरे (स्टोअर विभाग), अंकुश बर्गे, मधुकर गावडे (अर्कशाळा) आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरीचे स्टोअर कीपर देसाई यांच्यासह कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

साखर उद्योगातील अनेक तज्ञ व अभ्यासू मंडळी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे येतात त्यावेळी बगॅस मध्ये सेव्हिंग करण्याचा सल्ला देतात तथापि प्रतिदिन ५ लाख मे. टन गाळपक्षमतेच्या साखर कारखान्यात सुमारे २५० कोटी रुपयांचे साखर उत्पादन होते तर बगॅस मधून अवघे ४-५ कोटी रुपयांचे आणि इथेनॉल व स्पिरिट उत्पादनातून मिळणारा एकूण उत्पन्नाचा विचार केला तरी होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चापेक्षा ही रक्कम कमी होत असल्याने तोटा सहन करावा लागतो त्यासाठी साखरेला अधिक दर मिळण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे अन्यथा राज्यातील साखर कारखानदारी बंद पडण्याचा धोका असून त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्याचे आर्थिक नियोजन कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन साखर कारखानदारी टिकण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता स्पष्टपणे नमूद करतानाच साखर कारखानदारी मध्ये राजकीय हेतूने कोणताही विषय न मांडता साखर कारखानदारी टिकली पाहिजे या दृष्टीने एक विचाराने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

साखर दराबाबतच्या निर्णयामुळे ज्यांचे आदर्श घेऊन साखर व्यवसायाने आपली वाटचाल पुढे सुरु ठेवावी असे मोठमोठे नामांकित साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले असल्याचे निदर्शनास आणून देवून बंद पडलेले हे साखर कारखाने चालविण्यास घेण्यासाठी अनेक मंडळी पुढे येत आहेत याचाच अर्थ बंद पडणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट करताना त्याबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य निर्णय घेऊन साखरेच्या दरात अमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेली २३/२४ वर्षे साखर कारखाना चालविताना ऊसाला स्पर्धात्मक दर कामगारांना वेतन भत्ते बोनस आणि तोडणी वाहतूक कंत्राटदारांना नियमाप्रमाणे सर्व पेमेंट वेळेवर केली असली तरी केवळ कराराप्रमाणे व दिलेल्या शब्दाप्रमाणे कारखाना चालविण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला मात्र प्रत्येक वर्षी तोटा सहन करावा लागत असल्याने त्यांना करार मोडून कारखाना चालविण्यास असमर्थ असल्याची भावना व्यक्त करावी लागली त्यानंतर आम्ही संचालक मंडळाने स्वतः कारखाना चालवावा यासाठी प्रयत्न केले, मात्र कारखान्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन जिल्हा बँकेने अर्थसाह्य करण्यास असमर्थता व्यक्त केल्याने कारखाना चालविणे अशक्य झाले त्यावर पर्याय म्हणून न्यायालय आणि शासनाच्या मान्यतेने अन्य व्यक्ती अथवा संस्थेस कारखाना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला तथापि त्यालाही विरोध होत असेल तर श्रीराम बंद पडेल आणि बंद पडल्यानंतर ऊस उत्पादक किंवा तोडणी वाहतूक कंत्राटदारांना अन्य पर्याय उपलब्ध आहेत मात्र कामगारांना पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता तसेच ऊस उत्पादकांना पर्याय उपलब्ध असला तरी त्यांनाही आर्थिक नुकसानीची झळ बसू शकते याचा विचार करुन हा कारखाना अखंडित सुरु ठेवण्यासाठी सर्वांनीच एक विचाराने प्रयत्न केला पाहिजे, आम्ही संचालक मंडळही येथे कायम स्वरुपी राहणार नाही, कदाचित येथे अन्य कोणी येईल मात्र कारखाना अखंडित सुरु ठेवण्यासाठी सर्वांनीच एक विचाराने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.

सन १९५७ मध्ये म्हणजे सुमारे ७० वर्षांपूर्वी सुरु झालेला हा साखर कारखाना कामगारांमधील एक वाक्यता आणि या साखर कारखान्याविषयी असलेली त्यांची आपुलकीची भावना आणि कामगारांनी कधीही कामात कुचराई न केल्यामुळे हा कारखाना सतत उत्तम चालला असल्याचे आवर्जून सांगताना केवळ प्रतिदिन १२५० मे. टन गाळप क्षमतेचा हा कारखाना प्रतिदिन ५ हजार मे. टन गाळप क्षमतेचा झाल्यानंतरही केवळ गुंतवणूक करुन नव्हे तर कामगारांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावल्यानेच गेली २० वर्षे हा कारखाना उत्तम पद्धतीने चालविता आल्याचे निदर्शनास आणून देत या कारखान्याच्या यशस्वीतेमध्ये ऊस उत्पादक सभासदांनी इतकेच कामगारांचे ही योगदान महत्त्वाचे असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी आवर्जून सांगितले.

कामगारांचे भविष्य लक्षात घेऊन हा कारखाना अखंडित सुरु राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तथापि कामगारांनीही आपण या कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद असल्याचे लक्षात घेऊन कारखाना अखंडित सुरु राहील यासाठी साथ करावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच गेल्या वीस पंचवीस वर्षात आम्ही कामगारावर कोठेही अन्याय होऊ दिला नाही यापुढेही होऊ देणार नाही याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट शब्दात देताना, निवृत्त झालेल्या कामगारांना त्यांचे उर्वरित आयुष्य उत्तम आरोग्य, सुख समाधानात जावे अशी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केली.
राजघराण्याने लक्ष घातल्यानेच २५ वर्षांपूर्वी आर्थिक संकटात सापडलेला हा कारखाना त्यातून बाहेर काढण्यात यश आले असून या कालावधीत कामगारांची सुमारे १८ कोटीची थकीत देणी आणि वेळेवर पगार बोनस देण्याची व्यवस्था झाल्याचे निदर्शनास आणून देत राजघराण्याने लक्ष घातले नसते तर कदाचित आजचा निरोप समारंभ झाला नसता याची आठवण देत निवृत्त झालेले आणि कार्यरत असलेले सर्वच कामगार तालुक्यातील आहेत त्याचप्रमाणे ते स्वतः किंवा कुटुंबीय या कारखान्याचे सभासद या नात्याने मालक असल्याने त्यांनी हा कारखाना यापुढेही सुरु राहील यासाठी प्रयत्न करताना कारखान्याबाबत सुरु असलेल्या खोट्या-नाट्यप्रचाराला विरोध केला पाहिजे किंबहुना त्यामधील वस्तुस्थिती सभासदांसमोर मांडली पाहिजे, अशी अपेक्षा श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केली आणि निवृत्त होणाऱ्या कामगारांना शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि सुख समाधान लाभावे अशी प्रार्थना केली.

गेली २० वर्षे भागीदारी तत्वावर कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून श्रीराम व्यवस्थित सुरु असून कामगारांची थकीत देणी, पगार, बोनस, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस बिल, वहातूक बिल, तोडणी बिल वेळेवर मिळत असल्याचे निदर्शनास आणून देत जवाहर ने असमर्थता व्यक्त केल्यानंतर श्रीरामच्या व्यवस्थापनाला सदर कारखाना चालविणे अशक्य असल्यानेच अन्य पर्याय शोधण्यात आले असताना त्याला विरोध होत असल्याने कामगारा समोर अंधार दिसत आहे, कारखाना जर बंद राहिला तर कामगारावर उपासमारीची वेळ येणार असल्याने कामगारांच्या माध्यमातून एक दिवसाचे अन्न त्याग आंदोलनाद्वारे हा कारखाना अखंडित सुरू ठेवण्यासाठी शासन स्तरावर योग्य भूमिका घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे कामगार युनियनच्यावतीने प्रेमजीत काटे यांनी स्पष्ट केले.

कामगार हा शेवटी कामगार असल्याने त्याचे पोट मिळणाऱ्या पगारावर भरते मुलांची शिक्षणे व अन्य बाबी पगारावर अवलंबून असतात अशा परिस्थितीत गेल्या २ महिन्याचा पगार मिळाला नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याने हा कारखाना सुरु राहण्याऐवजी बंद पाडण्याचा प्रयत्न निश्चितच कामगार सहन करणार नाहीत असा इशाराच यावेळी प्रेमजीत काटे यांनी दिला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button