(कोरेगाव/ प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडील टोकावर असलेल्या रणदुल्लाबाद गावाला सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून टँकर मंजूर असूनही गावात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः महिला, वृद्ध आणि लहान मुलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अलीकडेच पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याचा फोटो समोर आल्यानंतर गावातील परिस्थितीची गंभीरता अधोरेखित झाली आहे. अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असताना विविध योजना, आश्वासने आणि निधी खर्चूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
उच्चशिक्षित नेतृत्व, तरीही मूलभूत प्रश्न कायम
रणदुल्लाबाद ग्रामपंचायतीला यापूर्वी डॉक्टर व वकील अशा उच्चशिक्षित व्यक्तींचे नेतृत्व लाभले. मात्र पाणी, रोजगार, प्रशासनिक सुविधा आणि सार्वजनिक सेवांशी संबंधित प्रश्न अद्यापही कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या मते, गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक उपलब्ध नाही. तसेच तलाठी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियमित उपस्थितीअभावी नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विहिरींवर लाखो रुपयांचा खर्च; परिणाम मात्र शून्य..?
गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विविध कालावधीत विहिरींची कामे करण्यात आली. मात्र कामांसाठी निवडलेल्या जागांबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी आक्षेप घेतला असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. परिणामी शासन व इतर यंत्रणांच्या निधीतून उभारलेल्या काही विहिरींना अपेक्षित पाणी न लागल्याने खर्चाचा लाभ गावाला मिळाला नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
गावातील जुन्या विहिरींच्या तुलनेत नव्याने करण्यात आलेल्या कामांच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
वाचनालयाचा प्रश्नही रखडला
गावातील युवकांसाठी कृषी वाचनालय उभारण्याची संकल्पना चर्चेत आली होती. मात्र त्यासाठी उपलब्ध झालेल्या निधीचा उपयोग नेमका कसा झाला, याबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आजही गावात विद्यार्थ्यांना व युवकांना दर्जेदार सार्वजनिक वाचन सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.
वाहतूक सुविधांचा अभाव
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रणदुल्लाबादला आजतागायत मुक्कामी एसटी बसची सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
विकासाच्या प्रतीक्षेत रणदुल्लाबाद
पाणी, रोजगार, वाहतूक, प्रशासनिक सेवा आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव यामुळे रणदुल्लाबाद आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. केवळ आश्वासनांवर न थांबता गावाच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने आणि परिणामकारक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बदलत्या सत्तांसोबत आश्वासनांची मालिका सुरू असली तरी रणदुल्लाबादकरांना अद्याप ठोस विकासाची प्रतीक्षा आहे. पाणीटंचाईसह इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्वरित निर्णय न झाल्यास नागरिकांचा असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Back to top button