(फलटण/प्रतिनिधी) : फलटणच्या औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्याची घोषणा करतानाच त्यासाठी आवश्यक जमिनींचे अधिग्रहण, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना नाडून, जबरदस्ती करुन न करता शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना हवे ते देवून विस्तार करण्याची ग्वाही देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द म्हणजे काळया दगडावरची भगवी रेष असून त्यांनी फलटणकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी औद्योगिक वसाहत विस्तार आणि बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी केले आहे.
२५५ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी निवड, बीएलए २ (BLA-2) नोंदणी अभियान आणि सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती, फलटण नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना सदस्यांचा सत्कार अशा संयुक्त शिवसेना महिला आघाडी, युवासेना आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथील मेळाव्यातअध्यक्षपदावरुन मार्गदर्शन करताना ना. उदय सामंत बोलत होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, खा. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, युवा सेना संपर्कप्रमुख सुजित खुडे, ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, संपर्कप्रमुख विराज खराडे, शिवसेना फलटण तालुकाप्रमुख नानासाहेब तथा पिंटू ईवरे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, माजी सभापती शंकरराव माडकर, सौ. रेश्मा भोसले, सह्याद्री कदम, सौ. वैशालीताई कांबळे, गिरीश बनकर, उपसभापती अमोल सस्ते, माण तालुका संपर्कप्रमुख बाळासाहेब मुलाणी यांच्यासह फलटण, कोरेगाव, माण, खटाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.
पोटॅशियम उत्पादन व पुरवठा क्षेत्रात जागतिक स्तरावरील तृतीय क्रमांकाचा कारखाना फलटण तालुक्यात आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद करीत या कारखान्याच्या निर्यातक्षम उत्पादन आणि रोजगार निर्मितीची माहिती आपण स्वतः या कारखान्यात जाऊन आज घेतल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार या कारखान्याला औद्योगिक वसाहतीमध्ये आगामी एक महिन्यात जागा देण्याची घोषणा उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी केली.
पश्चिम महाराष्ट्र साखर उत्पादनात आघाडीवर असल्याचे आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाला रास्त दर व रोजगार निर्मिती हे आपण आजपर्यंत पाहिले, अनुभवले मात्र पोटॅशियम उत्पादनात जगात तृतीय क्रमांक असलेला कारखाना पश्चिम महाराष्ट्रात फलटणमध्ये आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचे ना. उदय सामंत यांनी आवर्जून सांगितले.
शिवसेना पक्ष संघटना मजबुती करणासाठी शाखाप्रमुख आणि बीएलए २ ही रचना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे निदर्शनास आणून देताना एका लोकसभा मतदार संघात या माध्यमातून १६ हजार ५०० पदाधिकारी निर्माण होतील असे सांगताना फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघ या कामात आघाडीवर असून येथे १००% बीएलए २ नियुक्ती पूर्ण झाली असून आगामी काळात शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या करुन येथील पक्ष संघटन अधिक मजबुत होईल याची ग्वाही देताना येथे पूर्वी शिवसेनेचे काम होते, मात्र श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून येथे पक्ष संघटन मजबुत होण्याबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेत शिवसेनेला मोठे यश मिळाले असल्याचे निदर्शनास आणून देत धर्मवीर आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाद्वारे आगामी काळात शिवसेना येथे प्रमुख पक्ष असेल किंबहुना इथला आमदार शिवसेनेचा असेल याची ग्वाही ना. उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट शब्दात दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारातून बीएलए व त्यांच्या कुटुंबांना पूर्ण संरक्षण देवून त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करतानाच तळागाळातील कार्यकर्ता आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेणारे देशातील एकमेव नेतृत्व एकनाथ शिंदे यांचे असून ते दररोज १८/२० तास काम करतात तुम्ही पक्षासाठी केवळ २ तास वेळ द्या आगामी काळात शिवसेना हा महाराष्ट्रातील नंबर एकचा पक्ष असेल याची ग्वाही ना. उदय सामंत यांनी यावेळी दिली.
आजच्या बैठकीप्रमाणेच महाराष्ट्रातील १३६ मतदार संघांचा दौरा करुन पक्षाचा विस्तार, पदाधिकारी निवडी त्याचबरोबर शासकीय समित्या व जिल्हा नियोजन व विकास मंडळावरील निवडीबाबत सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना आपण व माजी खासदार राहुल शेवाळे देणार आहोत त्यामध्ये कोणाचा उजवा डावा याचा विचार न करता पक्षशिस्त सांभाळून पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी वेळ देणाऱ्या शिवसैनिकांना संधी देण्याची ग्वाही यावेळी ना. उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात दिली.
शिवसेनेत गटबाजी व मतभेदाला थारा न देता उत्तम काम करणाऱ्या शिवसैनिकाला प्राधान्य देऊन त्याला पाठबळ देण्याची शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याने महिला आघाडी, युवासेना आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेत उत्तम काम करावे असे आवाहन करतानाच अल्प कालावधीत पक्ष संघटन मजबुत करुन तो विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व त्यांचे सहकारी यशस्वी झाल्यामुळेच अल्पावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेत शिवसेनेचे सदस्य मोठ्या संख्येने निवडून आणण्यात शिवसेना यशस्वी झाली असल्याचे निदर्शनास आणून देत यावेळी नवनिर्वाचित उपसभापती अमोल सस्ते यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद नवनिर्वाचित सदस्यांचा ना. उदय सामंत व अन्य मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रारंभी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ना. उदय सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे, खा. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील जिल्हाप्रमुख अजित जाधव यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी व अन्य मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात आजच्या मेळाव्या विषयी सविस्तर माहिती देवून शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अल्पावधीत पक्षाच्या व शासनाच्या माध्यमातून दिलेले पाठबळ निश्चित पक्ष संघटना मजबुत करण्याबरोबर सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे नमूद करीत आगामी काळातही अशाच पद्धतीने पाठबळ मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी चंद्रहार पाटील, विराज खराडे, सौ. रेश्मा भोसले, बाळासाहेब मुलाणी यांची समयोचित भाषणे झाली. प्रमोद रणवरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
Back to top button