(फलटण / प्रतिनिधी ): निरोगी जीवनशैलीचा संदेश देत आणि फिटनेसची प्रेरणा देणारा अनोखा उपक्रम फलटण तालुक्यात पाहायला मिळाला. गाव ढवळ येथील शिक्षक तसेच फलटण रनर्स फाउंडेशनचे सदस्य श्री. बाळासाहेब शिंगाडे सर यांनी आपल्या 45 व्या वाढदिवसानिमित्त तब्बल 45 किलोमीटर धाव पूर्ण करून एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
दि. 10 जून 2026 रोजी पहाटे 3 वाजता विंचुर्णी फाटा, बिरदेव नगर येथून श्री. शिंगाडे सर यांनी या धाव मोहिमेला सुरुवात केली. सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांनी अथक प्रयत्न करत 45 किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःसाठी तसेच समाजासाठी आरोग्य आणि फिटनेसचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.
या धाव मोहिमेदरम्यान सहभागी धावपटूंसाठी श्री. शिंगाडे यांनी हायड्रेशन तसेच अल्पोपहाराची विशेष व्यवस्था केली होती. त्यांच्या या नियोजनाचे सर्वांनी कौतुक केले.
या प्रेरणादायी प्रवासात , फलटण रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष , , मॅडम, फलटण रनर्स फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच सेलिब्रेट लाईफ ग्रुपचे सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. त्यांनी शिंगाडे सरांसोबत धावत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करणारे बाळासाहेब शिंगाडे सर यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक विचारांचा आदर्श ठेवला आहे. वयाच्या 45 व्या वर्षी 45 किलोमीटर धाव पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या या फिटनेसप्रेमी आणि सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, “आरोग्य हीच खरी संपत्ती” हा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
Back to top button