आपला जिल्हा

गोविंद मिल्कच्या ६५० दूध संकलन कर्मचाऱ्यांसाठीचे उजळणी शिबिर संपन्न

(फलटण /प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण दूध संकलनाला अधिक बळ देण्यासाठी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, फलटण यांच्या वतीने दूध बल्क कुलर चालक, सेंटर चालक व कर्मचाऱ्यांसाठी विशेष उजळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर सोमवार, १५ जून २०२६ रोजी कोळकी (ता. फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात पार पडले. शिबिरात तब्बल ६५० जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मुंबई येथे १२ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर दूध संकलन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, स्वच्छता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोविंद मिल्कचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्र भल्ला यांच्या विशेष सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला.

शिबिरात दूध संकलन विभाग प्रमुख डॉ. गणेश सपकळ, बापूसाहेब हिप्परकर आणि ज्ञानेश्वर शिंदे यांनी मार्गदर्शन करताना स्वच्छ दूध संकलन, गुणवत्तेची मानके, अन्न सुरक्षा नियम आणि आधुनिक दुग्ध व्यवसायातील आवश्यक बाबींवर सविस्तर माहिती दिली. यावेळी गोविंद मिल्कच्या दूध संकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गेल्या ३० वर्षांपासून गोविंद मिल्कने स्वच्छ, ताजे व उच्च दर्जाचे दूध संकलन करण्याची परंपरा कायम राखली आहे. संस्थेशी संलग्न असलेल्या ३५ हजारांहून अधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य सातत्याने उपलब्ध करून दिले जाते. यामुळे गोविंद मिल्कने महाराष्ट्रासह देशभरात विश्वासार्ह दुग्ध संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे.

शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय अधिक किफायतशीर, आधुनिक व शाश्वत करण्यासाठी गोविंदच्या दुग्ध व्यवसाय विकास प्रशिक्षण विभागामार्फत गोठा पातळीवर तसेच बल्क कुलर केंद्रांवर प्रशिक्षण दिले जाते. डॉ. शांताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे.

उजळणी शिबिरामुळे दूध संकलन प्रक्रियेत आणखी सुधारणा होऊन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सर्व निकषांची प्रभावी अंमलबजावणी होईल, तसेच ग्राहकांना अधिक सुरक्षित व गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध होतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button