क्रीडा प्रतिनिधी :परभणी (बाळ तोरसकर) – १८ नोव्हेंबर : कै. प्रा. यु. डी. इंगळे (बाबा) स्मृती करंडक ५९ व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत परभणी, संभाजीनगर, मुंबई उपनगर, सातारा यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवित उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या कै. प्रा. सुरेश जाधव क्रीडानगरीत शेवटच्या साखळी सामन्यात पुरुष गटात संभाजीनगरने मध्यंतराच्या ८-९ अश्या पिछाडीवरून नांदेडवर १९-१७ अशी निसटती मात केली. त्यांच्या आकाश खोजेने याने आपल्या धारदार आक्रमणात ९ गडी टिपले. अभिषेक गावितने (१.५०, २.०० मि. संरक्षण व ३ गुण) अष्टपैलू खेळ केला. नांदेड कडून ओमकार धुमाळ (२.००, १.२०, १.१० मि. संरक्षण व ४ गुण) याने एकाकी लढत दिली.
दुसऱ्या सामन्यात यजमान परभणीने रायगडवर १६-१५ असा ३.५० मिनिटे राखून एक गुणाने विजय मिळविला. यात गजानन बळतकर (१.१०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण ) व ज्ञानेश्वर कवळे (२ व २ मि. संरक्षण) चमकले. रायगडच्या अनिकेत पाटीलचे (१ मि. संरक्षण व ४ गुण ) प्रयत्न अपुरे पडले. अन्य सामने एकतर्फी झाले.
महिला गटात पूजा फडतरे (२.३०, १.४० मि. संरक्षण व २ गुण ) प्रज्ञा माडकर (२ मि. संरक्षण व ३ गुण) यांच्या अष्टपैलू खेळीमुळे साताराने सोलापूरला १६-११ असे हरविले. सोलापूरकडून अश्विनी मांडवे (२ मि. संरक्षण व ५ गुण ), अणुष्का पवार (२.२०, १ मि. संरक्षण व २ गुण ) यांनी लढत दिली.
अन्य एका चुरशीच्या सामन्यात मुंबई उपनगरने मुंबईला १४-१३ असे २.४० मि. राखून हरविले. मुंबई उपनगरकडून मिताली बारसकर ( १.४०, २.१० मि. संरक्षण व ४ गुण ) आरती कदम (१.५० मि. संरक्षण व ३ गुण ) तर मुंबईकडून खुशबू सुतार (६ गुण ) व श्रेया नाईक (१.४०, १ मि. संरक्षण व ४ गुण ) चमकले. अन्य सामने डावाने झाले.
असे होणार उप उपांत्यपूर्व सामने :
पुरुष : मुंबई उपनगर-नंदुरबार, संभाजीनगर-धाराशिव, नाशिक-बीड, अहमदनगर-सांगली, ठाणे- परभणी, धुळे- मुंबई, सोलापूर- सातारा पालघर-पुणे.
महिला : पुणे-पालघर, सोलापूर-मुंबई उपनगर, सातारा-मुंबई, जालना- रत्नागिरी, धाराशिव-रायगड,अहमदनगर-सांगली, नाशिक-संभाजीनगर, धुळे- ठाणे.
पुरुष व महिला गटाच्या ५९व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे शानदार उद्घाटन
वेग, चपळता व स्टॅमिना असलेल्या पारंपारिक खो खो खेळाला आता चांगले दिवस आले आहेत. या गतिमान खेळातील पंचांचे निर्णय चुकू शकतात. हे निर्णय खिलाडूवृत्तीने मान्य करा, असे आवाहन खो-खो खेळाडूंना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
कै. प्रा. यु. डी. इंगळे (बाबा) स्मृती करंडक पुरुष व महिला गटाच्या ५९व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, परभणी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब जामकर, भाजप गटनेत्या मंगलाताई मुदगलकर, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, स्पर्धा सचिव डॉ. संतोष सावंत, सचिव डॉ. पवन पाटील, कार्याध्यक्ष डॉ. संतोष कोकीळ, प्राचार्य बी. यु. जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते ॲड शैलेश इंगळे, प्रा. जे. पी. शेळके, राज्य संघटनेचे सचिव ॲड. गोविंद शर्मा, खजिनदार ॲड. अरुण देशमुख, डॉ. प्रशांत इनामदार, कमलाकर कोळी, माजी सचिव संदीप तावडे, निवड समिती सदस्य किशोर पाटील, सुरेंद्र कुमार विश्वकर्मा, वृषाली वारद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. सुनील तुरुकमाने यांनी केले.
सर्व २४ जिल्ह्यांचा सहभाग
या स्पर्धेत महाराष्ट्र संघटनेशी संलग्न सर्वच्या सर्व २४ जिल्ह्यांनी भाग घेतला असल्याचे राज्य संघटनेचे सचिव ॲड. गोविंद शर्मा यांनी आपल्या मनोगतात सांगितले. सहभागी सर्व संघांनी बँडच्या तालात प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. अग्रभागी अहमदनगर तर शेवटी यजमान परभणी जिल्हा संचलनात सहभागी होता. ध्वजारोहणानंतर आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू शुभम जाधव याने सर्व संघांना शपथ दिली.
Back to top button
कॉपी करू नका.