ताज्या घडामोडी

ज्येष्ठ क्रीडा संघटक बाळ वाडवलीकर नाबाद ७५

मुंबई-  (बाळ तोरसकर) आरसीएफचे क्रीडा अधिकारी ज्येष्ठ क्रीडा संघटक बाळ वाडवलीकर उद्या २१ नोव्हेंबर रोजी वयाच्या ७५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आरसीएफ च्या सेवेत असताना त्यांनी आरसीएफ क्रीडा संकुलात कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॉकी, तायक्वांदो, जलतरण आदी विविध खेळांच्या स्पर्धांचे शानदार आयोजन करून सर्वांची शाबासकी मिळवली होती. ग्रामीण खेळाडूंना त्यांच्या खेळाचा विकास व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न करून या खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न वाडवलीकर यांनी नेहमीच केला.

वाडवलीकर यांनी अनेक युवा होतकरू खेळाडूंना आरसीएफमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. त्यामुळेच अनेक खेळाडूंचे संसार उभे राहिले. खासकरून देशी खेळावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यामुळे या खेळांच्या वाढीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. वाडवलीकर क्रीडा अधिकारी असताना कबड्डी, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल या खेळांमध्ये आरसीएफ संघाने आपला स्वत:चा वेगळा दबदबा निर्माण केला होता. तेव्हा आरसीएफच्या सेवेत या खेळातील अनेक दिग्गज खेळाडू कार्यरत होते.

आरसीएफ वसाहतीत अपना बाजार या संस्थेची शाखा सुरु करण्यात वाडवलीकर यांचा मोठा वाटा होता. आज या शाखेची यशस्वी वाटचाल सुरू असून वाडवलीकर त्या शाखेत पदाधिकारी आहेत. मुंबई आणि खास करून चेंबूर परिसरात विविध क्रीडा संघटना, सांस्कृतिक संस्था यांच्याशी वाडवलीकर यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवाचा लाभ या संघटना आणि संस्था घेत आहेत. कबड्डी खेळातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०१६ मध्ये कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी कृतज्ञता पुरस्कार देऊन वाडवलीकर यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला होता. सेवानिवृत्ती नंतर वाडवलीकर यांनी स्वत:ला क्रीडा क्षेत्रात पूर्ण वाहून घेतल्यामुळे आज महाराष्ट्रात ज्येष्ठ क्रीडा संघटक म्हणून त्यांची ओळख आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.