ताज्या घडामोडी
मुधोजी हायस्कूलचे माजी खो-खो खेळाडूंचा तब्बल ३२ वर्षानंतर स्नेहमेळावा
जीवनात संघर्ष करण्याची क्षमता खो-खो खेळामुळेच मिळाली

फलटण- प्रतिनिधी -फलटण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये खो-खो या पारंपरिक खेळाला मोठी परंपरा लाभली असून या परंपरेला जपण्यासाठी व जुन्या खेळाडूंना एकत्र आणण्याच्या उद्देशाने माजी खो-खो खेळाडूंचे स्नेहमेळावा तब्बल ३२ वर्षांनी आसू येथील सुभद्रा पार्क येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.

सकाळी १० वा. खो- खो चे सर्व खेळाडू सुभद्रा पार्क आसू येथे एकत्रित जमा झाले. यावेळी आयोजकांच्या वतीने स्वागत व ब्रेकफास्ट कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
या स्नेहमेळाव्यासाठी राज्याच्या विविध भागातीलच नव्हे तर चक्क मेलबर्न ऑस्ट्रेलियातून तृप्ती गुंजवटे ही माजी खेळाडू सहभागी झाली होती.
तब्बल ३२ वर्षांनंतर भेटलेल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद दिसून येत होता.
कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ व अनुभवी माजी खेळाडू यांनी विशेष मार्गदर्शन केले व त्यांनी आपल्या खेळाडू जीवनातील अनुभव सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच अनेक खेळाडूंनी आपल्या भाषणातून खो-खो खेळाचे महत्त्व अधोरेखित केले.
ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर जिल्हा, विभागीय तसेच राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मैदानावर जी जडणघडण झाली अनेक जय पराजय पचवण्याची प्रेरणा आपल्या वास्तववादी जीवनामध्ये खूप काही शिकवून गेली त्यामुळे अनेक प्रसंगाला सामोरे जात असताना कधीही खचून न जाता उत्तुंग यशाची भरारी मारण्यासाठी कशी उपयोगी पडली याचा अनुभव कथन केला व जीवनामध्ये खो-खो या खेळामुळे खूप काही प्रतिष्ठा व निरोगी व शारीरिक संपत्ती मिळवून दिल्याचा प्रत्यय आला असल्याचेही सांगितले व आजच्या तरुण पिढीने मोबाईल आणि इतर व्यसनांपासून दूर राहून खेळाकडे वळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.





