फलटण दि. १२ : शासकीय सेवा कालावधीत आपण समाधानी आहोत का याचे उत्तर आपले आपल्याला होकारार्थी येत असेल तर आपण यशस्वी झाल्याचे समजावे असे सांगून नंदकुमार दंडिले हे स्वतः समाधानी आहेत पण त्यांचे वरिष्ठ अधिकारी, सहकारी, पालक, विद्यार्थी समाधानी आहेत याचा अर्थ ते निश्चित यशस्वी झाले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी केले.
महाराष्ट्र राज्य एकल प्रा. शिक्षक सेवा मंच कोअर कमिटी सदस्य, नंदकुमार दंडिले माण पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी पदावरुन ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक यथोचित सन्मान अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे समारंभपूर्वक करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षपदावरुन अरविंद मेहता बोलत होते. यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण येथील अधिव्याख्याता विजयकुमार कोकरे, माण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे, एकल सेवा मंचचे राज्याध्यक्ष विकास खांडेकर, राज्य उपाध्यक्ष बळवंत पाडळे, जिल्हाध्यक्ष जोतिराम जाधव, कराड – पाटण सोसायटीचे संचालक भारत देवकांत, मोहन आगाशे, तालुकाध्यक्ष मोहन बोबडे व नंदकुमार कदम, कार्याध्यक्ष जितेंद्र ढमाळ
विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
नंदकुमार दंडिले यांचे शिक्षण क्षेत्रातील काम उत्तम असून सर्वांना सामावून घेऊन काम करण्याची त्यांची कामकाज पद्धती सेवा निवृत्तीनंतर एकल सेवा मंच आणि अन्य सामाजिक क्षेत्रात उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करताना अरविंद मेहता यांनी उभयतांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि सुख समाधान लाभावे अशी उत्तरेश्वर चरणी प्रार्थना केली.
डाएटचे अधिव्याख्याता कोकरे म्हणाले, दंडिले सर यांनी जीवनातील अनेक चढउतार आत्मविश्वासाने पार करुन आपली सेवा आनंदाने पार पाडली, शैक्षणिक कार्यात ते कधीही कोणाला रुतले नाहीत, आपले काम सदैव आनंदाने आणि प्रामाणिकपणे पार पाडले. काव्यात्मक रुपाने सरांवर स्तुतीसुमने उधळून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे म्हणाले,दंडिले यांच्या ९ महिन्यांच्या विस्तार अधिकारी पदाच्या कामाचे कौतुक आहे, अजूनही त्यांच्यामध्ये काम करण्याची एक नवी उमेद असल्याचे या कालावधीत दिसून आले, त्यांच्याकडून माण शिक्षण विभागाला मोठा फायदा झाला, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
राज्याध्यक्ष विकास खांडेकर म्हणाले, दंडिले यांनी त्यांच्या ३८ वर्षांच्या सेवेमध्ये ५ तालुक्यांमध्ये आनंदाने सेवा केली, या कालावधीत एकल शिक्षक सेवा मंचामध्ये तालुका कोषाध्यक्ष ते महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य या पदापर्यंत मजल मारुन संपूर्ण राज्यात सेवा मंच कार्याचा विस्तार केला.
त्याच्या सहवासात त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवणीत राहील असा होता.
कराड-पाटण सोसायटीचे संचालक भारत देवकांत म्हणाले, खांडेकर सर यांनी सेवा मंचाच्या माध्यमातून राज्य स्तरावर चांगल्या प्रकारे काम काज चालवले आहे आणि दंडिले सर हे त्या सेवा मंचात काम करत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. पाटण तालुक्यात दंडिले यांनी उत्तम काम केले, नवीन शिक्षकांना दुर्गम, डोंगरी भागात काम करण्याची प्रेरणा त्यांनी दिली.
नंदकुमार दंडिले म्हणाले, आपल्या सेवा काळात वेळेला खूप महत्त्व दिले आणि सेवा केल्या, सर्व तालुक्यात मित्र परिवार तयार केला. विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक मित्रत्वाचे नाते तयार केले, तसेच अधिकारी वर्गामध्येही कामाचा ठसा उमटवला, त्यामुळे ५ ही तालुक्यांमध्ये आनंदाने सेवा करु शकलो.
विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पालक वगैरे अनेकांनी आपल्या मनोगतामध्ये नंदकुमार दंडिले यांचे कौतुक करुन त्यांना दीर्घायुष्य चिंतले.
यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रा. शिक्षक बँकेचे आजी माजी संचालक, सर्व केंद्रप्रमुख व एकल प्रा. शिक्षक सेवा मंचाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी विजय मोरे, तात्याबा भोसले, राहुल नेवसे, विठ्ठल पवार, लक्ष्मण दीक्षित, दत्तात्रय कदम व त्यांनी सेवा केलेल्या ५ ही तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी, नातेवाईक, मित्र-मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
सुनिल तिवाटणे सर यांनी सूत्रसंचालन, सागर जाधव व सौ. शुभांगी बोबडे यांनी सर्वांचे स्वागत तर विजय दंडिले यांनी समारोप व आभार मानले.
Back to top button
कॉपी करू नका.