ताज्या घडामोडी

पत्रकारांच्या बातमीनंतर सत्ताधारी आणि प्रशासनाला जाग – प्रितसिंह खानविलकर

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा -‘फलटण शहरातील पालखी मार्गाच्या दुरावस्थेवर पत्रकारांनी सचित्र वार्तांकन केल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. काल दि. 19 रोजी रस्त्यांच्या दुर्दशेबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि आज शहरातील पालखी मार्गाच्या पाहणीची सुबुद्धी त्यांना आली आहे. याबद्दल पत्रकारांचे जाहीर आभार’’, अशी प्रतिक्रिया राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात, ‘‘शहरातील पालखी मार्गासह अन्य ठिकाणच्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत फलटणकरांच्या मनात तीव्र नाराजी आहे. माऊलींच्या पालखीचे आगमन ऐन तोंडावर आले असताना देखील ही दुरावस्था दूर करण्याबाबत कोणतीही हालचाल होत नव्हती. फलटणच्या पत्रकारांनी याबाबत छायाचित्रांसह वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर झोपलेले सत्ताधारी आणि प्रशासन खडबडून जागे झाले आणि आज या मार्गाची पाहणी त्यांनी केली आहे. रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत कितीही सारवासारव झाली तरी त्यांचा सुरु असलेला गलथान कारभार फलटणकर उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत; याची त्यांनी जाणीव ठेवावी’’, असेही प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे.

‘‘आजच्या पाहणी दौर्‍यानंतर तरी किमान संबंधित प्रशासकीय विभागाने दुरावस्था दूर करुन वारकर्‍यांची गैरसोय टाळावी. फलटणकरांसह वारकर्‍यांच्या रोषाचे पाप आपल्यावर ओढावून घेवू नये’’, अशी अपेक्षाही प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.