फलटण (प्रतिनिधी) – गो सन्मान आव्हान अभियान २०२६ अंतर्गत २७ एप्रिल रोजी देशभरात एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या अभियानात संत, गोसेवक, गोप्रेमी व गोरक्षक यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी फलटण तहसिलदार यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले.
फलटण तालुक्यातही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या अभियानाच्या माध्यमातून गोमातेला “राष्ट्रमाता” घोषित करावे, तसेच देशभरात गोहत्येवर संपूर्ण बंदी घालणारा सक्षम कायदा तातडीने करण्यात यावा, ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासोबतच गोसंवर्धनाला चालना देण्यासाठी अनेक पूरक मागण्या देखील मांडण्यात आल्या.
देशातील सुमारे ५००० तालुक्यांमध्ये एकाच दिवशी तहसील कार्यालयांमार्फत पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सुमारे १३०० नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन गोमातेबाबत जनजागृती केली आणि मोठ्या प्रमाणावर स्वाक्षऱ्या संकलित केल्या.निवेदनात गोशाळांना शासकीय अनुदान देणे, शासनाच्या ताब्यातील मंदिरांच्या माध्यमातून गोशाळा सुरू करणे, प्रत्येक जिल्ह्यात गोमातेसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारणे अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय दही, दूध, तूप, गोमूत्र आणि शेण या पंचगव्य पदार्थांवर वैज्ञानिक संशोधन करण्यावर भर देण्यात आला आहे.
तसेच शालेय व उच्च शिक्षणात गोमातेबाबत अभ्यासक्रम समाविष्ट करून गोसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागात गोसंवर्धनाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
फलटण तालुक्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला असून, गोसंवर्धनाच्या मुद्द्याला व्यापक लोकसमर्थन मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आयोजकांनी या अभियानाच्या पुढील टप्प्यातही अशाच प्रकारे जनजागृती वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Back to top button