अहिल्यानगर चौंडी : आस्था टाईम्स वृत्तसेवा – रविवारी आणि सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्यात खूप पाऊस झाला. सोमवारी दिवसभर सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सीना नदीला पूर आला. पाणी वाढल्याने सीना धरणातून आवर्तन वाढविण्यात आले.
त्यामुळे खालच्या बाजूला पाणी पातळीत आणखी वाढ झाली. सोमवारी रात्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) येथे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. गावात पाणी शिरु लागले. चौंडी विकास प्रकल्पत बांधण्यात आलेल्या वास्तू, शिल्पे यांना पाण्याचा वेढा पडू लागला. पाणी वाढतच असल्याने आणखी काही भाग पाण्याखाली जाऊन नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामस्थ चिंता करू लागले.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना कळविण्यात आले. त्यांनी सरकारी यंत्रणाकडून माहिती घेतली. यावर उपाय म्हणजे सीना धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी करणे, हा असल्याचे लक्षात आले. त्यानुसार सूचना देण्यात आल्या.
पाऊस कमी झाला होताच. त्यामुळे अंदाज घेत सीना धरणातून सोडण्यात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. त्यामुळे खाली पाणी पातळी कमी होत गेली. मंगळवारी सकाळपर्यंत गावातील पूर ओसरला. रात्री येऊ घातलेला धोकाही टळला. सीना धरणाचा पूर नियंत्रणासाठी असा वापर झाला.
मुख्य म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात उगम पावणारी आणि जिल्ह्याच्या हद्दीत एरवी कोरडी असणारी सीना नदी यावेळी उगमापासूनच दुथडी भरून वाहिल्याचे पाहायला मिळाले.
Back to top button