(सातारा /प्रतिनिधी) दि. ७-मागील दोन महिन्यांपासून महसूल विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांच्या’ माध्यमातून शासन लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम सुरू आहे.
आता पर्यंत ग्रामीण भागातील मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ८ मे रोजी जिल्ह्यातील सर्व नागरी भागांमध्ये एकूण १३ ठिकाणी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा शहरासह तालुका मुख्यालयाच्या सर्व ठिकाणी हे शिबिर होणार आहे. वाई येथील महाराजा स्व समाधान शिबिरासाठी अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, या शिबिरांमध्ये केवळ महसूल विभागासह शासनाचे सर्व महत्त्वाचे विभाग सहभागी होणार आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून लोकांना लागणाऱ्या सेवा, विविध प्रमाणपत्रे तात्काळ त्याच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री पाटील यांनी केले आहे.
उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल म्हणाले, महाराष्ट्र शासन व महसूल विभाग यांच्यावतीने उद्या दिनांक ८ मे २०२६ रोजी आपल्या सातारा शहरामध्ये ‘पोलीस करमणूक केंद्र’ या ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर’ घेण्यात येणार आहे.
यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, त्याचबरोबर सामाजिक साहाय्य योजना, महसूल विभागामार्फत दिले जाणारे वेगवेगळे जसे संजय गांधी निराधार योजना लाभ अशा वेगवेगळ्या लाभांचे वाटप होणार आहे.
त्याचबरोबर इतर विभागांचे देखील त्या ठिकाणी स्टॉल असणार आहेत. त्यामध्ये कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, आयजीआर विभाग, आयसीडीएस विभाग, हे सर्व विभाग त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी हा उपक्रम निश्चितपणे महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व सातारकरांनी यामध्ये भाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.
या शिबीरात
डिजिटल ७/१२ आणि ८-अ: क्युआर कोड (QR Code) सह डिजिटल स्वाक्षरीचे उतारे,
विविध दाखले उत्पन्न, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी, डोमिसाईल आणि नॉन-क्रिमीलेअर (NCL) दाखले.
फेरफार प्रकरणांचा निपटारा, प्रलंबित प्रकरणांचे जागेवरच निराकरण,अकृषक (NA) परवाना : गुंठेवारी आणि अकृषक परवान्यांबाबत मार्गदर्शन.
विविध योजना : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना इत्यादींचे लाभ
अशा सेवा देण्यात येणार आहेत.
हे शिबीर उद्या सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
Back to top button