आपला जिल्हामहाराष्ट्र

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा जपत महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा ; महिलांच्या सक्षमीकरणासाठी “सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशनचा “अनोखा उपक्रम

महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त आयोजन

(फलटण/ प्रतिनिधी ): महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण यांच्या पुढाकारातून सातारा जिल्ह्यात प्रथमच महिलांसाठी विशेष मोफत कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात आला.

महिला व मुलींना आत्मनिर्भर व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने फाउंडेशनतर्फे एक महिन्याचा बेसिक मेहंदी प्रशिक्षण वर्ग तसेच तीन दिवसीय साडी ड्रेपिंग (साडी ड्रेसिंग) प्रशिक्षण वर्ग पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा लाभ एकूण ७८ महिलांनी घेतला.प्रशिक्षणासोबतच महिलांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आले. अॅड. मयुरी शहा यांनी महिलांसाठी एक तासाचे व्याख्यान देत विविध महिला कायदे, हक्क, संरक्षणात्मक तरतुदी तसेच न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये कायदेशीर हक्कांविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली.

यावेळी फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, “स्त्री शिक्षित झाली तर समाज प्रगल्भ होतो आणि स्त्री सक्षम झाली तर राष्ट्र समृद्ध होते,” या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना अनुसरून महिलांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

या उपक्रमाला फलटण तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण यांनी सांगितले की, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या जयंती-पुण्यतिथी केवळ साजऱ्या करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रांजली ज्योतिबा जाधव यांनी प्रथम क्रमांक, सिद्धी दयानंद कवितके यांनी द्वितीय क्रमांक, तर अमीना सलीम शेख यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शबाना पठाण या सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहिताचे विविध उपक्रम राबवत आहेत. या प्रशिक्षणामुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या शबाना इनामदार, शीतल भोसले आणि रेश्मा कवितके यांचे फाउंडेशनतर्फे आभार मानण्यात आले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button