ताज्या घडामोडी

फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न : श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते जंगी मिरवणुकीचा शुभारंभ

फलटण प्रतिनिधी- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे न्याय, समता व बंधूतेचा अनोखा संगम तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी केवळ कायदे बनवले नाही तर प्रत्येक वंचित घटकाला आपला न्याय व अधिकार मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्राशन केल्या नंतर आपण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी वंचितांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा कानमंत्र दिला अशा या थोर महापुरुषाची जयंती काल देशभर सर्वत्र साजरी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर फलटण शहरांमध्ये मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. जयंती महोत्सवाचे औचित्य साधून सायंकाळी ७ वाजता टेंगुळ चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने आयोजित केलेल्या जंगी मिरवणुकीचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आ. श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस मोठ्या थाटामाटात व फटाक्याच्या आतषबाजीत करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भिम अनुयायांसह इतर समाजातीलही युवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यामध्ये प्रामुख्याने प्रशासनाच्या वतीने डॉ. अभिजीत जाधव, फलटण कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, विद्यमान आ. सचिन पाटील, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे ना. निंबाळकर, विरोधी पक्ष नेते समशेर सिंह ना. निंबाळकर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, सातारा जिल्हा ॲम्युचर खो- खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सनी अहिवळे, नगरसेवक सचिन अहिवळे, गटनेते अशोक जाधव भाजपचे जिल्हा चिटणीस जयकुमार शिंदे, चेअरमन सुधीरशेठ अहिवळे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार महसूल तुषार गुंजवटे, अभिजीत ना. निंबाळकर, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ प्रसाद जोशी, ॲड. ऋषिकेश काशीद, गंधवार्ताचे संपादक रोहित अहिवळे, स्थैर्यचे संपादक प्रसन्न रुद्रभटे,माजी नगरसेविका प्रगती भाऊसाहेब कापसे, माजी नगरसेवक अनिल शिरतोडे, बिल्डर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद निंबाळकर इ. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबेडकर चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने थंड पाणी ताक व सरबत चे मोफत वाटप करण्यात आले होते.
तसेच दिपक अहिवळे यांच्याकडून प्रतिवर्षाप्रमाणे लाडूचे वाटप करण्यात येत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना एस.टी. स्टँड फलटण व पंचशील ऑटो रिक्षा संघटना बारामती चौक फलटण यांच्यावतीने मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जयंतीचे औचित्य साधून फलटणमध्ये अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले गेले.

या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मिरवणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर महिलांनी व पुरुषांनी गर्दी केल्याचे दिसून आले यामध्ये प्रामुख्याने दोन दोनच्या रांगे प्रमाणे महिला जय भिमच्या घोषणा देत पुढे सरकत होत्या. त्यांच्या पाठीमागे तरुण – युवकांनी दोन दोनच्या रांगा करून हजारो युवक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. जिकडे तिकडे जय भिम – जय भिमचा नारा देत हजार भिमसैनिक युवक- युवती मोठ्या उत्साहात या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.
ढोल ताशा, झांज पथक बँजोच्या तालात निघालेल्या या मिरवणूकीत घोड्यावर स्वार झालेल्या छोट्याशा रमाई तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीकृती असणारी भव्य मूर्ती तसेच रथात बसलेली चिमुकली जोडी हे सर्व काही फलटणकारांचे लक्ष वेधून घेणारे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघालेली हि मिरवणुक बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ व उमाजी नाईक चौक, गजानन चौकातून महात्मा फुले चौक – मारवाड पेठ – शुक्रवार पेठ – शंकर मार्केट मंडई – टोपी चौक- कसबा पेठ येथून मंगळवार पेठेत कोणताही अनुचित प्रकार न घडता या मिरवणुकीचा समारोप शांततेत करण्यात आला.
यानिमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, फलटण शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

यंदाच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.
तसेच भव्य-दिव्य बुद्धांची मूर्ती उभी करून आकर्षक व देखना सेट उभा केला होता. हा सेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता त्याचबरोबर युवक युवतींसाठी आबाल वृद्ध यांच्यासाठी सेल्फी पॉईंट देखील या निमित्ताने उभा करण्यात आला होता.
तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी, मुलींसाठी विविध स्पर्धा तसेच मुलांच्यासाठी व मुलींसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व व डान्स स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.