ताज्या घडामोडी

सद्गुरु गोदडनाथ महाराज यांच्या पादुकांचे फलटण येथे उस्फूर्त स्वागत : श्रीराम मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी

फलटण प्रतिनिधी –  श्री संत सद्गुरु गोदडनाथ महाराज, कर्जत जि. अहिल्यानगर यांच्या दिव्य पादुकांचे येथील मुधोजी मनमोहन राजवाड्यातील राजघराण्याच्या देवघरात नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्यावतीने श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी यथोचित स्वागत, पूजा, अभिषेक व आरती केली, त्यावेळी नाईक निंबाळकर देवस्थानकडील परंपरागत मानकरी सेवेकरी आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येने तसेच कर्जत येथून सद्गुरु महाराजांच्या पादुका घेऊन आलेली मंडळीही उपस्थित होती. सुमारे ११८ वर्षानंतर सद्गुरु गोदडनाथ महाराज यांचे फलटण येथे आगमन झाले. फलटणकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

श्री संत सद्गुरु गोदडनाथ महाराज देवस्थान, कर्जत येथील अभय पाटील, पंढरीनाथ काकडे, उदय काकडे, कुमार भोसले, रणजित नलवडे, सचिन सोनमाळी, अथर्व सोनमाळी, परशुराम क्षीरसागर यांच्यासह अनेक भक्तगण सदर पादुका घेऊन फलटण येथे आले, फलटणच्या प्रवेशद्वारी नाईक निंबाळकर देवस्थान व इतर चॅरिटीज ट्रस्टच्यावतीने आणि फलटण व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्यावतीने श्री संत सद्गुरु गोदडनाथ महाराज यांच्या पादुकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

त्यानंतर सदर पादुका पालखीमध्ये ठेवून मिरवणुकीने श्रीराम मंदिरात आणण्यात आल्या तेथे प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मणाच्या मूर्ती समोर या पादुका ठेवून प्रभू श्रीराम सीता माता आणि सद्गुरु गोदडनाथ महाराज यांची नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट मान्यवर आणि कर्जत येथील मान्यवरांच्या हस्ते यथोचित सेवा, पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर सदर पादुका मुधोजी मनमोहन राजवाड्यातील राजघराण्याच्या देवघरात ठेवण्यात आल्या.


स्वातंत्र्यपूर्व काळात फलटण संस्थांच्या गादीवर श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज असताना श्री संत सद्गुरु गोदडनाथ महाराज सलग १२ वर्षे मुधोजी मनमोहन राजवाड्यात वास्तव्यास होते, या कालावधीत त्यांनी प्रतिवर्षी पंढरपूर आषाढी वारी केली. ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीदरम्यान जात असत.


फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्यातील आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राज घराण्यातील अन्य मंडळीही सातत्याने कर्जत येथे सद्गुरु गोदडनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी जात असतात, अलीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील यशानंतर माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर सर्व विजयी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांसह सद्गुरु गोदडनाथ महाराजांच्या दर्शनासाठी गेले असता तेथील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे महाराजांच्या पादुका फलटण येथे घेऊन येण्याचे सुतोवाच केले.

श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी तात्काळ होकार देत सद्गुरुंच्या पादुकांचे यथोचित स्वागत पूजा अभिषेक करण्याचे मान्य करीत पादुका घेऊन येण्यास सहमती दर्शविली त्यानंतर सदर पादुकांचे फलटण शहरात आगमन व विधीवत पूजा अर्चा करण्यात आली, सुमारे ११८ वर्षानंतर सद्गुरु गोदडनाथ महाराज यांचे फलटण येथे आगमन झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट आणि फलटणकरांनी उस्फुर्त स्वागत केले.

यावेळी राजघराण्याच्या देवघराचे पुजारी शामराव राजाराम निकम, प्रभू श्रीरामाचे पुजारी योगेश पेटकर, पुरोहित राजीव देशपांडे, नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चारिटी ट्रस्टचे व्यवस्थापक दशरथ यादव, बाबा सूर्यवंशी, भाविक महेंद्र जयवंतराव ढवळे, डॉ. सागर निकम, सौ. सविता कापडी यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.


सद्गुरु गोदडनाथ महाराज यांच्या पादुका समवेत येथे आलेल्या कर्जत येथील मान्यवरांनी यापुढे प्रतिवर्षी सद्गुरु गोदडनाथ महाराज यांच्या पादुका फलटण येथे घेऊन येण्याचे मान्य करुन त्याप्रमाणे नियोजन करण्याचे याप्रसंगी स्पष्ट केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button