फलटण प्रतिनिधी- जम्मू- काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात अनेक नागरिक आणि पर्यटक जखमी झाले आहेत तसेच या हल्ल्यात काही निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. विशेष करून नाव जात विचारून फक्त पुरुषांना टारगेट करून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. ही बाब निश्चितच निंदनीय निषेधार्य असून या घटनेमुळे संपूर्ण भारत देशात दुःखाची आणि संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं आणि बंद पाळण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यामधील मुस्लिम युवा बांधवांनी एकत्रित येऊन पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा मोर्चा काढून हल्ल्यात मूर्त पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच देश विघातक कृत्य करणाऱ्या प्रवृत्तींचाही मुस्लिम बांधवांनी कायमच निषेध व्यक्त करून भारत देशाविषयी असणारे आपले प्रेम व राष्ट्रीय एकात्मता दाखवून दिली आहे.
त्यामुळे कायम फलटण तालुक्यामध्ये हिंदू- मुस्लिम बांधवांमध्ये जातीय सलोखा बंधुभाव कायमच राखला गेला आहे.
या निषेध मोर्चामध्ये प्रामुख्याने फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी, पैलवान पप्पूभाई शेख, पैलवान मेहबूब मेटकरी, जमशेदभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते रियाज इनामदार शाकीरभाई महात, सादिक भाई बागवान, पै. वसीम मणेर, निजामभाई आतार, इमरान कुरेशी, हैदर मेटकरी इत्यादी सामाजिक कार्यकर्तेसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष करून पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आपला जीव गमवावा लागला असून ते शहीद झाले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाम हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात ५ मोठे निर्णय घेतलेत. त्यात सर्वात महत्त्वाचा निर्णय सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात आली आहे. भारतातून पाकिस्तानपर्यंत चार धरणे आणि त्यांच्या संबंधित कालव्यांद्वारे सिंधू नदीचे पाणी पोहोचवले जात होते, परंतु आता ते बंद करण्यात आले आहे. नदीचे पाणी अडवल्याने पाकिस्तानच्या शेतीवर, विशेषतः पंजाब आणि सिंधमधील शेतीवर परिणाम होईल या हल्ल्यानंतर निश्चितच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत.