फोंडा, गोवा- (क्रीडा प्रतिनिधी) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी गटातील सलग दुसरा विजय संपादन केला. पुरुष गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगालचा ६०-२२ असा ३८ गुणांनी दणदणीत पराभव केला. तर महिला गटात महाराष्ट्राने केरळवर ६२-२६ असा ३६ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला.

येथील फोंडा मल्टीपर्पज मैदानावर सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पश्चिम बंगालवर दणदणीत विजय मिळविताना कर्णधार रामजी कश्यपने २.२० मी. संरक्षण करत १० गडी बाद केले. फर्जंद पठाणने २.०० मी. संरक्षण करत ८ गडी टिपले. आदित्य गणपुलेने २.३० मी. पळतीचा खेळ करून २ गडी बाद केला, तर सुयश गरगटेने नाबाद १.२० मी. संरक्षण करून ४ गडी बाद केले. केरळ संघाकडून मूर्तजा अलीने एकतर्फी लढत देत १.४० मी. संरक्षण करून महाराष्ट्राचे ४ गडी बाद केले.

अपेक्षेप्रमाणे महिला गटातील महाराष्ट्राचा केरळ विरुद्धचा सामना एकतर्फी झाला. या सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने तब्बल ३६ गुणाने विजय नोंदवला. या यशात अष्टपैलू खेळाडू प्रियंका इंगळे हिचा मोलाचा वाटा ठरला. तिने १.४० मी. संरक्षण करून आपल्या धारधार आक्रमणाने १२ गुण मिळवले. रेश्मा राठोडने १.५० मी. संरक्षण करताना ८ गुण मिळवले. प्रियांका भोपीने २.४० मी. पळतीचा खेळ करत आक्रमणामध्ये ४ गुण मिळवले. प्रिथा एस.ने १.२० मी. संरक्षण करत महाराष्ट्राचे ८ गुण मिळवले. तर के. आर्याने १.५० मी. संरक्षण करताना ४ गुण मिळवण्यात यश मिळवले.
काल गटातील ओडिसाबरोबर पहिला सामना गमावणाऱ्या केरळ पुरुष संघाने आज कर्नाटकवर ४८-४२ असा ६ गुणांनी विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले आहे. गटातील पहिला सामना जिंकणाऱ्या दिल्ली महिला संघाला आज मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. कर्नाटक संघाने दिल्ली महिला संघावर ५०-३२ असा १८ गुणांनी विजय संपादन केला.
Back to top button
कॉपी करू नका.