ताज्या घडामोडी
भविष्यात भारत हा जगातील सर्वात शक्तिशाली देश होईल- प्रांताधिकारी सचिन ढोले
५१ व्या फलटण तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास २०० शाळांनी सहभाग नोंदविला

फलटण प्रतिनिधी- विज्ञान प्रदर्शनासाठी येणारी मुले ही त्या शाळेतील टॉपर मुले असतात त्यामुळे या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनासाठी आलेली मुले ही खूप हुशार असून भविष्यात या मुलांमधील अनेक मुले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतील यामधील काही मुलांनी वैज्ञानिक देखील व्हावे. कारण जगामध्ये सर्वत्र तरुण मुलांची संख्या झपाट्याने कमी होतेय. मात्र या उलट भारतामध्ये तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भारताकडे कुशल मनुष्यबळ असणार आहे. व या कुशल मनुष्यबळाच्या जीवावर भारत हा जगातील सर्वात शक्तिशाली देश बनणार असल्यामुळे भविष्यात जग चालवण्याची जबाबदारी भारतावर असणार आहे. असे प्रतिपादन फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले.

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती फलटण तसेच सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने गुणवरे येतील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल येते आयोजित केलेले 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उद्घाटन प्रसंगी सचिन ढोले बोलत होते.
यावेळी गटशिक्षण अधिकारी अनिल संकपाळ, फलटण तालुका विस्तार अधिकारी मठपती साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी दारासिंग निकाळजे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विशाल पवार, सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी संचालिका सौ. प्रियांका पवार, फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, फलटण पंचायत समितीचे सदस्य संजय कापसे, दैनिक पुढारीचे प्रतिनिधी पोपट मिंड गुणवरे गावचे सरपंच तसेच पोलीस पाटील अमोल आढाव इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे सचिन ढोले म्हणाले की, भारताकडे कुशल मनुष्यबळ असल्यामुळे कारखाने परदेशी असतील मात्र त्यात काम करणारे इंजिनियर आपले असतील दवाखाने जगातील असतील मात्र त्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर्स आपले असतील, जगातील अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे कुशल मनुष्यबळ हे भारताचे असणार आहे.

त्यामुळे जगाचे नेतृत्व करण्याची ताकद आपल्याकडे निर्माण होणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणतात की, योग्य वेळी योग्य घेतलेला निर्णय, त्यासाठी असणारे धाडस व लागणारी इच्छाशक्ती तिन्ही गुणांचा ज्यांच्यामध्ये संगम होतो तीच व्यक्ती यशस्वी होते.

म्हणून मुलांनो तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर जसे की, निर्णय क्षमता पाहिजे धाडस पाहिजे तसं योग्य वेळी योग्य कृती करण्याची क्षमता पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम ध्येय निश्चित करावे व ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कृती कार्यक्रम आखून तो कार्यक्रम जगला पाहिजे तरच मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो असे ही शेवटी प्रांताधिकारी संतोष ढोले म्हणाले




