फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – के. बी. उद्योग समूहाने कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे केलेले काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी केले आहे.
फलटण येथील केबी उद्योग समूहाने कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची माहिती जाणून घेण्यासाठी खा. शरद पवार व सौ प्रतिभाताई पवार हे आले होते यावेळी पवार बोलत होते. यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्रात एका नावीन्यपूर्ण आणि वनस्पतींच्या अल्कोलाईड्सपासून रसायनमुक्त किटकनाशकांच्या निर्मितीमध्ये एक महत्वाची भूमिका के.बी. उद्योग समूह निभावत आहे. जी अतिशय उल्लेखनीय असून शेतकऱ्यांचे भविष्य तुम्ही नव्या मार्गावरून यशाकडे घेऊन जात आहात आणि सर्व शेतकऱ्यांच्या हितार्थ कार्य करत असल्याचे सांगून पवार यांनी विशेष करून केबी उद्योग समूहाचे सचिन यादव यांचे तोंड भरून कौतुक केले.
खरंतर गेली अनेक वर्ष केबी उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतीविषयक सखोल ज्ञान, अचूक मार्गदर्शन व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करून उद्याच्या भविष्याचा विचार करता विषमुक्त शेती म्हणजेच सेंद्रिय शेती पिकवण्यासाठी तसेच निर्यातक्षम व भरघोस उत्पादन मिळवण्याची नवसंजीवनी देणारी तसेच वनस्पतीजन्य आधारित कीटकनाशके व खतांची निर्मिती करणारी भारतातील प्रथम व अग्रगण्य कंपनी म्हणजेच के.बी. बायो ऑरगॅनिक्स १९६२ मध्ये भारत देशात हरित क्रांतीची सुरुवात झाली. हरित क्रांतीमूळे सुरुवातीच्या काळात अन्नधान्याचे उत्पादन तर वाढले परंतु भरमसाठ रासायनिक कीटकनाशके व खतांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर खूप मोठे दुष्परिणाम तर होतच आहे शिवाय निर्यातक्षम शेतमाल उत्पादनास खूप मोठा फटका बसत आहे. त्यामुळे केमिकल रेसिड्यू फ्री शेतमाल उत्पादन करणे ही सध्या राज्यातील तसेच संपूर्ण देशातील खूप मोठी समस्या बनली आहे व याच समस्येवर के. बी. उद्योग समूह गेली कित्येक वर्ष यशस्वी पद्धतीने कार्यरत आहे व हे कार्य पाहण्यासाठी खास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, त्यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई पवार तसेच इतर सहकारी यांनी सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी फलटण येथील के. बी. एक्सपोर्ट व के. बी. बायो ऑरगॅनिक्स या दोन कृषी क्षेत्रातील अनुक्रमे निर्यात व वनस्पतीजन्य आधारित कीटकनाशकांच्या क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कंपनीस भेट देण्यासाठी आले होते.
यावेळी कंपनीचे संचालक सचिन यादव व त्यांच्या पत्नी सौ. सुजाता यादव यांनी खा. शरद पवार व त्यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई पवार यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान कंपनीच्या सर्व युनिट्सची त्यांनी पाहणी केली यामध्ये सर्व प्रयोगशाळा व त्या अंतर्गत चालणारे काम तसेच संशोधन प्रक्रियेमध्ये कंपनीने केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. कंपनीच्या अद्ययावत प्रयोगशाळांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी के. बी उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव व त्यांच्या टीमने कंपनीच्या वाटचालीवर आधारित एक माहितीपूर्ण सादरीकरण खा .शरद पवार व त्यांच्या टीम पुढे सादर केले. तसेच जैविक शेतीचा जागतिक बाजारपेठेतील वाढता प्रभाव, निर्यातक्षम जैविक उत्पादनांची व्याप्ती आणि भारतातील शेतकऱ्यांसाठी असलेली सामाजिक बांधिलकी यावर सविस्तर चर्चा झाली.यावेळी आ.शशिकांत शिंदे, शरयू कारखान्याचे चेअरमन युगेंद्र पवार, सुनील माने, नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.