ताज्या घडामोडी

लायन्स क्लबच्या माध्यमातून अत्यंत उत्तम सेवाकार्याची परंपरा जपली जात आहे : श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर

फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – लायन्स क्लब ही सेवाकार्यात नेहमीच आघाडीवर असलेली संघटना असून फलटण लायन्स क्लबच्या माध्यमातून गेल्या सुमारे ५० वर्षाहून अधिक काळ हे सेवाकार्य अत्यंत उत्तम पद्धतीने सुरु आहे. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या येथील वास्तव्यादरम्यान सोहळ्यासमवेत येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी फलटण लायन्स क्लब नेहमीच आघाडीवर राहिला आहे. यावर्षी फलटण लायन्स क्लबच्या सौ. नीलम लोंढे पाटील यांना रिजन चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाली असून त्यांनी रीजन मधील अनेक लायन्स क्लबला आणि त्यांच्या सदस्यांना या सेवाकार्यात सहभागी करुन घेत माऊलींची अत्यंत उत्तम सेवा करण्याचा उपक्रम राबविला असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहेत.
७ जिल्ह्याच्या रिजन मधील सातारा, कराड, इस्लामपूर, फलटण वगैरे सुमारे २०/२२ लायन्स क्लब या सेवा कार्यात सहभागी करुन घेत रिजन चेअरमन सौ. नीलम लोंढे पाटील यांनी रिजन मेगा ॲक्टिव्हिटी अंतर्गत संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्या समवेत चालणाऱ्या वारकरी, भाविक, भक्तांना नाश्ता, सुगंधी दूध, पाणी उपलब्ध करुन दिले, त्याच्या वितरण समारंभात मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन डॉ. वीरेंद्र चिखले यांच्यासह विविध लायन्स क्लबचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिजन चेअर पर्सन लायन नीलम लोंढे पाटील यांनी वारकरी भाविकांना नाश्ता पाणी वगैरे खाद्यपदार्थांबरोबरच सीड बॉल वितरित केले असून त्या माध्यमातून वारकरी भाविकांनी वृक्षारोपण चळवळीला हातभार लावावा ही अनोखी संकल्पना इस्लामपूर लायन्स क्लबच्या माध्यमातून रुजविण्यात येत असताना त्यांनी वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर सीडबॉल उपलब्ध करुन दिले ही कौतुकास्पद बाब असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी आवर्जून सांगितले.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. वीरेंद्र चिखले हे स्वतः कीर्तनकार असून त्यांनी या विषयात कीर्तन विशारद ही पदवी घेतली असल्याने माऊली आणि पालखी सोहळ्याची निकटचा संबंध असलेल्या डॉ. चिखले यांनी या रीजन मेगा ऍक्टिव्हिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक करताना लायन्स वर्ष जुलैपासून सुरु होत असून आपल्या कार्याचा शुभारंभ नीलम लोंढे पाटील यांनी या अत्यंत कौतुकास्पद उपक्रमाद्वारे केल्याने आगामी काळात त्यांच्या माध्यमातून या रिजनमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीचे सेवा कार्य घडेल असा विश्वास व्यक्त केला. लायन्स क्लबला या उपक्रमासाठी कोणतीही शासकीय मदत उपलब्ध नसते तथापि लायन्स पदाधिकारी आणि सदस्य स्वनिधीतून हे सेवा कार्य राबवीत असतात त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद निश्चित कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट प्रतिपादन डॉ. वीरेंद्र चिखले यांनी केले.
फलटण लायन्स क्लबचे अध्यक्ष जगदीश करवा व त्यांचे सहकारी या क्लबच्या माध्यमातून अत्यंत उत्तम सेवा कार्य करीत असून पन्नास वर्षाची सेवाकार्याची परंपरा लाभलेल्या या क्लबमधून आलेल्या नीलम लोंढे पाटील आगामी काळात संपूर्ण रिजनमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने सेवा कार्य विविध उपक्रमाद्वारे राबवतील त्यांना आम्हा सर्वांची साथ निश्चित लाभेल असा विश्वास डॉ. वीरेंद्र चिखले यांनी आवर्जून व्यक्त केला.

फोटो :

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.