(फलटण /प्रतिनिधी):- भगवान बुद्धांचे विचार आणि शिकवण कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नाही. त्यांची शिकवण मानवी जीवनासाठी अतिशय उपयुक्त आहे, म्हणूनच जगभरातील लोक त्यांचा आदर करतात.बुद्धांनी दिलेली शिकवण अहिंसा, करुणा, दया, आणि शांती यांसारख्या मूल्यांवर आधारित आहे. ही मूल्ये कोणत्याही भौगोलिक सीमेपलीकडे जाऊन प्रत्येक माणसासाठी महत्त्वाची आहेत. म्हणूनच भगवान बुद्ध यांना ‘जगद्गुरू’ आणि ‘जगत वंदनीय’ म्हणतात! असे प्रतिपादन भारतीय बौध्द महासभा माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा संघटक श्रीमंतराव घोरपडे यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील अकरावे पुष्प गुंपताना केले.ते निरगुडी येथे वर्षावास प्रवचन मालिकेत मार्गदर्शन करताना बोलत होते.
भगवान बुध्दाने दिलेला अष्टांगिक मार्ग (सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी) हा दुःखातून मुक्ती मिळवण्याचा एक व्यावहारिक मार्ग आहे, जो कोणताही व्यक्ती आपल्या जीवनात वापरू शकतो. बुद्धांनी लोकांना कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यास सांगितले नाही. त्यांनी लोकांना स्वतः अनुभव घेऊन सत्य जाणून घेण्यास सांगितले. त्यांची शिकवण तर्क आणि अनुभवावर आधारित आहे, ज्यामुळे ती आधुनिक जगातील विचारवंतांनाही आकर्षित करते. म्हणूनच, त्यांचे विचार केवळ धार्मिक नसून वैज्ञानिक आणि तार्किक मानले जातात.
बुद्धांनी समाजातील जात, धर्म, लिंग किंवा वर्ण यांवर आधारित भेदभाव नाकारला. त्यांनी सर्वांना समान मानले. त्यांनी केवळ मानवांसाठीच नाही, तर सर्व सजीवांप्रती प्रेम आणि करुणेचा संदेश दिला. यामुळे, त्यांच्या शिकवणीने समाजात समानता आणण्यास मदत केली.
बुद्धांच्या शिकवणीचा मुख्य उद्देश व्यक्तीला स्वतःच्या आत पाहण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता. त्यांनी बाह्य कर्मकांडांऐवजी मनाच्या शुद्धीकरणावर आणि आत्म-ज्ञानावर भर दिला. यामुळे लोक स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकले आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवू शकले. या सर्व कारणांमुळे, गौतम बुद्ध केवळ एका धर्माचे संस्थापक म्हणून ओळखले जात नाहीत, तर ते असे एक महान शिक्षक आहेत ज्यांनी जगाला एक नवीन दृष्टी दिली. त्यांचे विचार आजही जगभरातील कोट्यवधी लोकांना मार्गदर्शन करतात, म्हणूनच त्यांना ‘जगद्गुरू’ आणि ‘जगत वंदनीय’ मानले जाते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी जनगणनेमध्ये होणाऱ्या नोंदी संदर्भात जात व धर्म याबाबतीत जागरूकता बाळगण्याचा संदेश दिला.त्यांनी बौद्ध विहारात उपस्थित राहून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे पठन करण्यासंदर्भात सूचना दिली नाही.
यावेळी भंते काश्यप जी यांनी उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले. भारतीय बौध्द महासभा तालुका अध्यक्ष महावीर भालेराव सर, तालुका महासचिव बाबासाहेब जगताप सर, तालुका कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, फलटण तालुका कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते सर, धम्म प्रसारक सोमीनाथ घोरपडे, निरगुडी गावचे बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फलटण तालुक्याचे भूषण ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई आयु-तुषार मोहिते साहेब यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ निरगुडी गावच्या बौद्ध उपासक उपासिकाना भेट देण्यात आहे. त्यासोबत उपस्थितांना संविधान प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले.
Back to top button
कॉपी करू नका.