आपला जिल्हा
देशाला आज भगतसिंग यांच्या विचारांची गरज- प्रा.डॉ.प्रभाकर पवार


मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘क्रांतिकारक शहीद भगतसिंग जयंती’,कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.डॉ.प्रभाकर पवार पुढे म्हणाले,भगतसिंग विसाव्या शतकातील महान भारतीय क्रांतिकारक एक आदर्श व लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या स्वातंत्र्यवादी,पुरोगामी व विज्ञानवादी विचारांनी भारतीय समाजसुधारणा व स्वातंत्र्य चळवळीला खूप मोठी प्रेरणा मिळाली त्यांनी देशासाठी सशस्त्र लढा तर दिलाच पण अत्यंत लहान वयात त्यांनी ‘नौजवान भारत सभा’, ‘कीर्ती किसान पार्टी’, ‘हिंदुस्तान सोशालिस्ट’ व ‘रिपब्लिकन असोसिएशन’ यासारख्या आधुनिक व परिवर्तनवादी विचारांच्या संघटना काढल्या त्या युवकांच्यात अतिशय लोकप्रिय होत्या त्यांनी पत्रकारिता व पुस्तक लेखनही केले. मी नास्तिक का आहे..? हे त्यांचे लोकप्रिय पुस्तक आजही भारताला प्रेरणा देताना दिसते. त्यांच्यावर कार्ल मार्क्स, ब्लादिमीर लेनिन,बकुनीन समाजवाद व कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव होता.त्यांच्या कृती कार्यक्रमातून अनेक क्रांतिकारक व समाजसुधारक जन्माला आले. आज देश संक्रमण काळातून जात असताना खऱ्या अर्थाने क्रांतिकारक भगतसिंग यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रा. डॉ.प्रभाकर यांनी आवर्जून सांगितले.