मुंबई -(बाळ तोरसकर) परळच्या लाल मैदानात विद्यार्थी क्रीडा केंद्राने आपल्या सत्तराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सलग ६०व्या खो-खो स्पर्धेत ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने आपल्या शानदार खेळाची झलक पेश करताना कुमार आणि पुरुषांच्या गटात बाजी मारून सुरेख दुहेरी मुकुटाचा मान संपादन केला. यंदाच्या नव्या मोसमातील त्यांच्या दोन्ही संघांनी सलग तिसरे विजेतेपद मिळवून विजयाची दमदार हॅटट्रिक साधली.

विभागीय निमंत्रित ४ फूट ११ इंच कुमार गटाच्या निर्णायक लढतीत विहंगने मुंबई उपनगरच्या नंदादीप स्पोर्ट्स क्लबचा ३ गुणांनी सहज पराभव केला. अष्टपैलू खेळ करणारा रोहित राठोड त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पहिल्या डावात ४ मिनिटे २० सेकंद आणि दुसऱ्या डावात ५ मिनिटे ३० सेकंदाचा पळतीचा सुरेख खेळ केला. तसेच १ गडी टिपला. त्याला करण गुप्ता, अमन गुप्ताने चांगली साथ दिली. अमन गुप्ताने पहिल्या डावात २ मिनिटे ४० सेकंद आणि दुसऱ्या डावात १.३० मिनिटे संरक्षण केले. करण गुप्ताने आक्रमणात ३ गडी टिपले. नंदादीपच्या प्रणव उत्तेकर, मंदार जंगस, अरमान अन्सारीने संरक्षणात चमक दाखवून विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण ते शेवटी अपुरेच ठरले. प्रणवने ३ मिनिटे, २ मिनिटे ४० सेकंद, मंदारने ३ मिनिटे आणि आरमानने ३ मिनिटे १० सेकंद, १ मिनिटे २० सेकंद पळतीचा सुरेख खेळ केला. उपांत्य फेरीच्या लढतीत विहंगने ठाण्याच्या ज्ञान विकास स्पोर्ट्स फाऊंडेशनचा आणि नंदादीपने मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात ज्ञानविकासने महात्मा गांधीला नमवले.
पुरुष विभागाचे जेतेपद मिळवताना विहंगने ठाण्याच्याच ग्रिफीन जिमखान्याला चुरशीच्या लढतीत १ गुण आणि २ मिनिटे २० सेकंद राखून पराभूत केले. अष्टपैलू खेळ करणाऱ्या लक्ष्मण गवस, रंजन शेट्टी, आकाश कदम या त्रयीचा विहंग च्या विजयात मोठा वाटा होता. लक्ष्मणने ३ मिनिटे, १ मिनिट ५० सेकंद पळतीचा सुरेख खेळ करताना ३ गडी देखील टिपले. रंजनने १ मिनिट १० सेकंद, १ मिनिट ५० सेकंद हुलकावण्या देत झकास संरक्षण केले. तसेच आक्रमणात ३ गडी देखील बाद केले. आकाशने १ मिनिटे ४० सेकंद संरक्षण करताना २ गडी देखील बाद केले. या तिघांना आदित्य कांबळे, अशिष गौतमने उत्तम संरक्षण करून चांगली साथ दिली. आदित्यने २ मिनिटे २० सेकंद तर अशिषने दोन्ही डावात प्रत्येकी १ मिनिटे ४० सेकंदाचा पळतीचा चांगला खेळ केला. ग्रिफीनच्या राज सकपाळ, सुफियान शेख, साहिल खोपडे आणि सुजित धनावडे या चौघांनी सरस अष्टपैलू खेळ करून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण ते अपुरेच ठरले. राजने धारदार आक्रमण करताना ५ गडी टिपले. तसेच दीड मिनिटे, १ मिनिटे ४० सेकंदाचा पळतीचा खेळ केला. साहिलने २ मिनिटे संरक्षण करताना २ गडी देखील बाद केले. सुफीयानने १ मिनिटे १० सेकंद आणि सुजितने दीड मिनिटे पळतीचा खेळ केला. तसेच या दोघांनी प्रत्येकी १ गडी टिपला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात विहंगने यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राचा आणि ग्रिफीनने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात सरस्वतीने विद्यार्थीला रंगतदार लढतीत अलाहिदा डावात १ गुणांनी नमवले.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह अॅडव्होकेट गोविंद शर्मा यांनी केले. स्पर्धेची परंपरा सातत्याने राखत सलग ६० वर्षे स्पर्धा आयोजन करत असल्याबद्दल शर्मा यांनी विद्यार्थी क्रीडा केंद्राचे कौतुक केले. ही परंपरा भविष्यात देखील विद्यार्थी क्रीडा केंद्र कायम सुरुच ठेवेल असा विश्वास देखील शर्मा यांनी व्यक्त केला. स्पर्धेचा बक्षिस समारंभ विद्यार्थी क्रीडा केंद्राचे अध्यक्ष गजानन वाईरकर, कार्याध्यक्ष यशवंत नाईक, उपाध्यक्ष धनंजय सावंत, सचिव पराग आंबेकर, बाळ धुरी, छत्रपती पुरस्कार प्राप्त पांडुरंग परब, लालबागच्या महाराजाचे अध्यक्ष सुधीर साळवी, स्पर्धा निरीक्षक कमलाकर कोळी, महिला शाखा प्रमुख सौ. भारती पेडणेकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे खजिनदार अॅड. अरुण देशमुख, मुंबई खो-खो संघटनेचे प्रमुख कार्यवाह सुरेंद्रकुमार विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पुरस्कार विजेते खेळाडू : कुमार गट : अष्टपैलू – रोहित राठोड, आक्रमक – करण गुप्ता (दोघे विहंग), संरक्षक – अरमान अन्सारी (नंदादीप), पुरुष विभाग : अष्टपैलू – रंजन शेट्टी, संरक्षक – लक्ष्मण गवस (दोघे विहंग), आक्रमक – राज सकपाळ (ग्रिफीन जिमखाना)
Back to top button
कॉपी करू नका.