मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी आज विधिमंडळ कामकाजाचा आढावा घेण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणाली संदर्भात सन्माननीय सदस्यांना सुयोग्य पध्दतीने अवगत करण्यात यावे. सभागृह कामकाजातील सदस्यांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच सन्माननीय सदस्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तत्परतेने कार्यवाही व्हावी, असे निदेश हि यावेळी प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले.
तसेच यासोबतच मनोरा आमदार निवासचे बांधकाम सुरू झाले असून त्यामध्ये सभागृह, वाचनालय, अद्ययावत वाहनतळ, सुसज्ज भोजन कक्ष, सदस्य आणि सहायकांसाठीची प्रशस्त निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. मॅजेस्टीक आमदार निवासचे देखील वारसा वास्तूवैभव कायम ठेऊन अतिशय देखणे असे नुतनीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने पीठासीन अधिकारी यांच्या निवासासाठी मलबार हिल येथे ‘अजिंठा’ इमारतीची सुसज्ज वास्तू उभारण्यात येत आहे. ही सर्व बांधकामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत आणि सन्माननीय सदस्यांना तातडीने त्याचा लाभ घेता यावा यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या.
याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ (कार्यभार) श्री. जितेंद्र भोळे, सचिव-२ (कार्यभार) डॉ. विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी वर्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.