प्रतिनिधी -दिनश लोंढे फलटण दि.8 – श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण येथील प्रा. डॉ. संदेश सोपानराव बिचुकले यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 चा आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल शिव स्वराज्य बहुउद्देशीय संस्था, नेवासा, जि. अहमदनगर यांच्याकडून 2023 सालचा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
प्रा. डॉ. बिचुकले सरांचे शिक्षण एम. ए. (हिंदी, मराठी), बी. एड., सेट, नेट, पीएच.डी. असून हिंदी हा त्यांच्या अध्ययन व अध्यापनाचा विषय आहे. त्यांनी आतापर्यंत नऊ वर्ष यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय व वीस वर्षे नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय येथे अध्यापनाचे कामकाज केले आहे. विविध कार्यशाळा, परिषद, सेमिनार यामध्ये त्यांनी आपले योगदान दिले आहे. तसेच त्यांनी 15 पेक्षा अधिक संशोधन लेख लिहिलेले आहेत व ते विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशित झाले आहेत. विविध महाविद्यालयामध्ये नवनवीन विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी व्याख्याने दिली आहेत. हिंदी विषयात व्यंग्य कथाकथन हा त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य विषय आहे. संशोधन, ऑनलाइन (कोरोना कालखंड) व ऑफलाइन अध्ययन, राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), केंद्रीय हिंदी शिष्यवृत्ती, विविध उपक्रम, अध्यापनेतर योगदान इत्यादी कार्यासाठी त्यांना सदर पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. डॉ. श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी माननीय सचिन भैय्यासाहेबांनी प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांचे अभिनंदन केले व उत्तम काम करण्यासाठी त्यांना मौलिक मार्गदर्शन केले. त्याचबरोबर भैय्यासाहेबांनी सरांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक करून त्यांचा गुणगौरव केला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जाधव, प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. श्रीराम एज्युकेशन सोसायटी च्या अध्यक्षा मा. श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे संचालक सदस्य माननीय श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक वृंद व कर्मचारी यांनी आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Back to top button
कॉपी करू नका.