(फलटण /प्रतिनिधी)शिक्षण, समाजसेवा, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल श्री. काशिनाथ सोनवलकर यांना महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी विडणी या संस्थेमार्फत ‘आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार २०२५’ हा पुरस्कार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.संस्थेचे अध्यक्ष हणमंतराव अभंग, उपाध्यक्षा डॉ.सौ.सुचिता शेंडे, सचिव राजू पवार व सर्व विश्वस्त मंडळ, संस्थेचे सल्लागार माजी प्राचार्य रामदास अभंग यांनी या बहुमानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री.काशिनाथ सोनवलकर यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवन, फलटण येथे क्रीडाशिक्षक आणि इतिहास विषयाचे शिक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली. यासोबतच, त्यांनी परमपूज्य आत्मगिरी महाराज आश्रमशाळा बुध ता. खटाव जि. सातारा येथे अध्यापनाचे कार्य केले.जिल्हा परिषद केंद्रशाळा झिरपवाडी येथे अंशकालीन निर्देशक म्हणूनही काम केले आहे. श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ़ हॉर्टिकल्चर, फलटण येथे शारीरिक निर्देशक म्हणून काम केले. त्यांचे विद्यार्थी नेहमीच क्रीडा आणि अभ्यासाच्या क्षेत्रात चमकले आहेत. केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्येही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेक घटकांना मदत मिळाली असून, त्यांच्या योगदानाला ही एक योग्य पोचपावती मिळाली आहे.
पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले, “या पुरस्काराचे श्रेय माझ्या गुरुवर्य डॉ.मॅक्सिन बर्नसन, डॉ.मंजिरी निंबकर यांना देतो. आपल्याला अगदी पूर्व प्राथमिकपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अध्यापन कसे करावे याचे बाळकडूच या दोघींकडून मिळाल्याचे ते सांगतात. जेवढं आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये राहता येईल तेवढा विद्यार्थी आपल्याला घडवता येईल हे त्यांनीच मला शिकवले. मला माझ्या गुरुवर्यांचा अभिमान वाटतो. त्या आज नव्वदी पार केलेली असताना सुद्धा अजून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय काम करतच आहेत. या माझ्या गुरुवर्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ते संपूर्ण देशभर मला क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून काम करण्याची संधी. जवळपास तीनशे विद्यार्थी माझे स्काऊटच्या माध्यमातून राज्य पुरस्कार प्राप्त झाले. राज्य मेळावा नाशिक या ठिकाणी मी आठ विद्यार्थी घेऊन गेलो होतो. या ठिकाणी संपूर्ण देशातून माझा विद्यार्थी दिग्विजय शांताराम कदम हा बेस्ट कॅडेट म्हणून निवडला गेला.
या ठिकाणी महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला. आमची निवड केरळ येथे नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प पालोद,केरळ याठिकाणी महाराष्ट्र चे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली.मी मुलांकडूनही भरपूर काही शिकलो. गटचर्चा केली.गट अध्यापन केले. या सगळ्या प्रवासात मला माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचं व कुटुंबीयांचं मोलाचे सहकार्य प्राप्त झाले. त्यांचाही मी मनापासून ऋणी आहे. हा जो पुरस्कार मला मिळाला आहे तो माझ्या कर्मभूमीतला पुरस्कार आहे तो मी आनंदाने स्वीकारला आहे. यापूर्वीही मला अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. अगदी याच वर्षी मला राजर्षी छत्रपती शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्काराने ही गौरवण्यात आले आहे. परंतु कर्मभूमीतला हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सध्या ते उत्तरेश्वर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज विडणी या ठिकाणी आहेत.या पुरस्काराने त्यांच्या अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमाची दखल घेतली गेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत!
Back to top button
कॉपी करू नका.