फलटण प्रतिनिधी- आज घरामध्ये बसून जगामध्ये काय चालले आहे हे ज्ञान आपणाला मिळत असतानाच अशा ज्ञानाचा फायदा घेऊन मुलांनी आपले करिअर करणे गरजेचे असून मुलांच्या करिअरसाठी पालकांनी देखील त्या मुलांचा कल कोणत्या शाखेकडे आहे व त्याचे टॅलेंट ओळखूनच त्याला त्याच्या कलानुसार व टॅलेंटनुसार शिक्षण देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादक महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

साखरवाडी ग्रामस्थांच्या वतीने नुकतीच आय.ए.एस. पदी अनिकेत फडतरे व लेफ्टनंटपदी शिवम बोंद्रे यांचे निवड झाल्याबद्दल त्यांचा साखरवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ फेटा भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला होता. याप्रसंगी श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर बोलत होते.

यावेळी महानंदा दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन डि.के. अण्णा पवार, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, अभयसिंह नाईक निंबाळकर, विनोद कुचेकर, रमेश कुचेकर सर, शरदराव जाधव, साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच समीर भोसले, जयपाल भोसले व विलास गिरी, सरदार वल्लभाई पटेल हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य काळे सर पर्यवेक्षक भोईटे सर इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कामगार नेते पोपटराव भोसले यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.

यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये आम्ही गेली ३० वर्षे पूर्ण क्षमतेने तालुक्याच्या विकासासाठी काम करीत असून प्रामुख्याने सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आणि हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहे. यापूर्वीही आमचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी नीरा उजवा कालवा आणल्यामुळे व उर्वरित निरा- देवघर व नव्यानेच धोम- बलकवडी धरणाची निर्मिती करून तालुक्यातील जनतेच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यशस्वी झालो असल्यामुळे तालुक्यातील जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करू शकलो आहे. यापुढेही फलटण तालुक्याचे भविष्य घडविण्यासाठीच आम्ही कार्यरत राहणार असल्याचे सांगून रामराजे म्हणतात फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून साखरवाडी येथे भविष्यात “स्पर्धा परीक्षा” केंद्र उभा करणार असून याचा फायदा निश्चितच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना झाल्याशिवाय राहणार नाही.
आज साखरवाडीचे सुपुत्र अनिकेत फडतरे आणि शिवम बोंद्रे यांनी उज्वल यश प्राप्त करून साखरवाडी गावातील तरुणांच्या मध्ये एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. अनिकेत फडतरे यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम करीत माणसांमध्ये राहून समाजातील सर्वसामान्य माणसांची सेवा करावी व आपला एक वेगळा आदर्श निर्माण करावा अशी ही अपेक्षा शेवटी श्रीमंत रामराजे यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली
याप्रसंगी सत्कारमूर्ती अनिकेत फडतरे व शिवम बोंद्रे यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी व मान्यवरांना मार्गदर्शन केले.
Back to top button
कॉपी करू नका.