फलटण प्रतिनिधी- फलटण डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून फलटण शहरातील व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स यांच्यासाठी क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, रिंग टेनिस, बुद्धिबळ व मॅरेथॉन इ. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या खेळाबरोबर या प्रत्येक खेळाशी संबंधित विविध ब्रीदवाक्य देऊन हा खेळ खेळण्यात आला असल्याची माहिती फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र बिचुकले यांनी दिली आहे.
या स्पर्धेबाबत अधिकची माहिती देताना डॉ. रवींद्र बिचुकले म्हणाले की, वरील सर्व खेळांबरोबर अनेक “ब्रीदवाक्य” जोडली गेली होती. यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट या स्पर्धेमध्ये चौकार व षटकारामागे एक झाड लावणे यामागे प्रामुख्याने ‘वृक्षारोपण चळवळ वाढविणे” हा प्रमुख हेतू होता.
तर टेनिस या खेळामध्ये स्मॅश मारला की “झाडे लावा झाडे जगवा” बॅडमिंटनमध्ये एखाद्या खेळाडूने स्मॅश मारल्यानंतर “पर्यावरणाचे रक्षण करा” ही टॅग लाईन तर रिंग टेनिसमधून “महिला सक्षमीकरणाचा” संदेश देण्यात आला होता.
तसेच बुद्धिबळ या खेळांसाठी “सतत हालचाल करून व्यायाम करा व लठ्ठपणा कमी करा” अशी टॅगलाईन देण्यात आली होती. त्याचबरोबर मॅरेथॉन या स्पर्धेमध्ये “रन फॉर नेचर म्हणजे निसर्गासाठी कायम जागृत राहून काम करा” अशा टॅग लाईन देऊन
एक प्रकारे सामाजिक बांधिलकी ठेवून समाजातील प्रत्येक घटकासाठी एक आगळावेगळा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला होता. अशीही माहिती शेवटी डॉ. रवींद्र बिचुकले यांनी दिली.
विशेष करून या स्पर्धेसाठी फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.अशोक नाळे, डॉ. स्वप्ना जाधव, फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. चेतन गुंदेचा, फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे खजिनदार डॉ. वल्लभ कुलकर्णी यांच्यासह फलटण शहरातील व तालुक्यातील ज्येष्ठ डॉक्टरांबरोबर बहुसंख्य डॉक्टरांचा सक्रिय सहभाग दिसून आला.
फलटण शहरातील फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम साजरे करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न झाला आहे.
म्हणून त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल फलटण शहरातील अनेकांनी फलटण डॉक्टर्स असोसिएशन व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.