श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून आळजापूर वितरिका पाईप लाईन कामासाठी २१ कोटी १८ लाख रुपये मंजूर – धैर्यशील अनपट
कामाची लवकरच निघणार निविदा

फलटण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून धोम – बलकवडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत उजवा कालवा कि. मी. ८६ मधील सा. क्र. ८५/२०० येथून निघणाऱ्या आळजापूर वितरिकेच्या खुल्या कालव्याऐवजी बंदीस्त पाईप-लाईन टाकण्याच्या योजनेस तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार या कामासाठी २१ कोटी १८ लाख ६७ हजार ३५४ रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या कामाच्या निविदा निघतील आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीत धैर्यशील अनपट म्हणतात की, महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे आळजापूर वितरिका खुल्या कालव्याऐवजी बंदीस्त पाईप लाईन योजनेस नुकतीच मान्यता मिळाली असून सदर कामाच्या निविदा व प्रत्यक्ष काम सुरु होणार असल्याचे धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
आळजापूर वितरिकेद्वारे एकूण १६७५.७० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून त्यामध्ये आळजापूर २०९.२१ हेक्टर, कापशी ३८५.३५ हेक्टर, सासवड ५७५.८७ हेक्टर, बिबी १०२.६५ हेक्टर, घाडगेवाडी २००.३१ हेक्टर, मुळीकवाडी २०२.३१ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
महाराष्ट्राच्या वाट्याचे ५९४ टीएमसी पाणी ऑगस्ट २००० पर्यंत अडवून त्याचा वापर सुरु केला नाही तर फेरवाटपात या पाण्यावरील राज्याचा हक्क जाण्याचा धोका निर्माण झाला असताना सन १९९६ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, मात्र पाण्याच्या प्रश्नांवर प्रस्थापितांच्या पराभव करुन कायम दुष्काळी पट्ट्यातील विविध मतदार संघातून ४२ अपक्ष आमदार विधान सभेत पोहोचले होते, आपल्या मतदार संघातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ही पर्वणी समजून या अपक्ष आमदारांनी तत्कालीन शिवसेना – भाजप युती सरकारला पाठिंबा देण्याचा व त्या बदल्यात राज्याच्या वाट्याचे संपूर्ण पाणी मुदतीत अडविण्यासाठी तातडीने निधीची तरतूद करण्याची मागणी तत्कालीन अपक्ष आमदारांच्यावतीने अपक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आणि ती मान्य होऊन मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना – भाजप – अपक्ष युतीचे सरकार सत्तारुढ झाले, त्यानंतर फलटण येथे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या पाणी परिषदेत कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना व त्या माध्यमातून राज्याच्या वाट्याचे संपूर्ण पाणी मुदतीत अडविण्याचा निर्णय घेण्यात आला.
धोम – बलकवडी प्रकल्पास सन १९९६ मध्ये मान्यता मिळाली, त्यानंतर गतीने प्रकल्प आणि डावा व उजवा कालव्यांची कामे पूर्ण करण्यात आली, परंतू या प्रकल्पाच्या वितरिकांची कामे अपूर्ण राहिल्याने लगतच्या ओढ्यात पाणी सोडून ते शेतीला देण्यात आले त्यातून भोर, फलटण, खंडाळा तालुक्यातील ९२ गावातील १८ हजार १०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची योजना होती.
या प्रकल्पाला जून १९९६ मध्ये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली, सन १९९९ – २००० मध्ये घळभरणी झाली आणि सन २००८ पासून या प्रकल्पात पुर्ण क्षमतेने पाणी साठा करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी याची पीक रचना ४ माही होती, तथापि सदर पीक रचना किमान ८ माही असली पाहिजे अशी मागणी झाल्याने त्याबाबत विचार करता प्रकल्पात केवळ २.७० अ. घ. फू. पाणी साठत असल्याने ८ माही करण्यासाठी जादा पाण्याची आवश्यकता असल्याने ०.९३ अ.घ.फू. पाणी नीरा – देवघर प्रकल्पातून घेण्याचा प्रस्ताव समोर आला असल्याचे सांगून पुढे प्रसिद्धी पत्रकार म्हणतात नीरा – देवघर प्रकल्पातून ०.९३ अ.घ.फू. पाणी घेण्यास सन २००० मध्ये मान्यता घेतल्यानंतर धोम – बलकवडी प्रकल्पाचा सुधारित प्रकल्प अहवाल जुलै २००२ मध्ये मान्यता, त्यानंतर प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प अहवालास मे २०१७ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
धोम – बलकवडी प्रकल्पासाठी आवश्यक ०.९३ अ.घ.फू. पाणी वापर सुधारित प्रकल्प अहवालास मार्च २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली. त्यानुसार नीरा – देवघर प्रकल्पाच्या उजवा कालवा सा. क्र. २१/३३० येथे उत्रोली, ता. भोर गावाजवळ छेद घेऊन ३९४५ मीटर लांबीची पाईप लाईन टाकून धोम – बलकवडी प्रकल्प उजवा कालवा सा. क्र. १९/५०० म्हणजे बोगदा क्रमांक ३ च्या मुखाशी कान्हवडी, ता. खंडाळा येथे हे पाणी सोडण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ नोव्हेंबर २०२३ मध्ये करण्यात आला आहे असेही शेवटी पत्रकार म्हटलं आहे.