परभणी प्रतिनिधी (विजय देवकाते) – छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक तेजस्वी, प्रेरणादायी आणि लोकमान्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन हे शौर्य, बुद्धिमत्ता, न्यायप्रियता आणि स्वाभिमानाचे प्रतीक राहिले आहे. महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अफाट पराक्रम, धैर्य आणि दूरदृष्टी दाखवली. आदिलशाही, मुघल आणि पोर्तुगीज अशा बलाढ्य शत्रूंशी लढत असताना त्यांनी शिस्तबद्ध आणि कौशल्यपूर्ण राज्यकारभार उभारला. महाराजांनी लोककल्याणकारी राज्याच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आत्मविश्वास जागवला आणि त्यांना एकजुटीने उभे राहण्याची प्रेरणा दिली असे प्रतिपादन आमदार रत्नाकर गुड्डे यांनी केले.

आलेगाव तालुका पूर्णा येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी आमदार रत्नाकर गुड्डे बोलत होते.
याप्रसंगी बोलताना पुढे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण म्हणजे केवळ इतिहासाचा गौरव नव्हे, तर आजच्या पिढीसाठी सुद्धा प्रेरणास्थान आहे. त्यांच्या जीवनातील प्रेरणा, स्वराज्याची संकल्पना, धर्मनिरपेक्षता, महिलांचा सन्मान, जलद निर्णयक्षमता आणि लोकसेवेची तळमळ, ही मूल्ये आधुनिक भारतासाठीही अत्यंत आवश्यक आहेत. त्यांचा पुतळा उभारणे म्हणजे त्यांच्या विचारांचे स्मरण ठेवणे आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प पुन्हा दृढ करणे होय. अशा थोर वीराच्या स्मृतीरूप पुतळ्याचे अनावरण हे प्रत्येकासाठी अभिमान आणि प्रेरणेचा क्षण आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या एकतेतून उभा राहिलेला हा पुतळा आपल्या सर्वांच्या मनात नवचैतन्य जागवत राहिल, असेही त्यांनी सांगितले.
शिवरायांचा पुतळा म्हणजे केवळ शिल्प नव्हे, तर शौर्य, आत्मसम्मान, त्याग आणि राष्ट्रप्रेमाचे जिवंत प्रतीक आहे. या पुतळ्याच्या साक्षीने नव्या पिढीला स्वाभिमानाने उभं राहण्याची, अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळेल, याची मला पूर्ण खात्री आहे. असा विश्वास आमदार गुड्डे यांनी व्यक्त केला.
यावेळी मित्रमंडळाचे प्रभारी बंटी कदम, तालुकाध्यक्ष सुभाष देसाई, पूर्ण शहराध्यक्ष राजेश भालेराव, नंदकुमारजी डाखोरे, गीतारामजी देसाई, सरपंच उत्तमराव डोणे मामा, यांच्यासह मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.