फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा – आज फलटण तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आली. याप्रसंगी फलटण येथील यशवंतराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवाराच्या राष्ट्रवादी कडून आमदार म्हणून निवडून आलेले सचिन पाटील व राष्ट्रवादीचे फलटण तालुका अध्यक्ष व पदाधिकारी हे सर्वजण भाजपाशी आपण किती प्रामाणिक आहोत हेच वारंवार दाखवून देताना आढळून आले आहेत. निवडून आल्यापासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आजपर्यंत तरी एकही ठोस कामगिरी केलेली दिसून आली नाही याउलट भारतीय जनता पक्ष कसा वाढेल असाच प्रामाणिक प्रयत्न केला आहे व आपली निष्ठा ही भाजपाशी किती प्रामाणिक आहे हेच वारंवार दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन युवा नेते विजयकुमार भोंडवे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे विजय भोंडवे म्हणतात की,
फलटण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांची उद्घाटने करण्यात आली होती यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समोर राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपचेच एवढे काही तोंड भरून कौतुक केले की, ते आपण राष्ट्रवादीचे आमदार असल्याचेच ते विसरून गेले व त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे तोंडभरुन आपल्या भाषणात वारंवार कौतुक केले.
हे करीत असताना मात्र त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आपल्या पक्षाचे चिन्ह घड्याळ याचे विस्मरण झाले होते की, काय म्हणून शेवटच्या काही सेकंदात औपचारिकता म्हणून राष्ट्रवादीने व अजित पवार यांनी मला संधी दिल्याबद्दल अजित पवार यांचे एका वाक्यात त्यांनी आभार मानल्याचे सांगून भोंडवे म्हणतात यामुळे जनतेत एकच चर्चा होती ती म्हणजे सचिन पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत की भाजपाचे आमदार आहेत अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसून आली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, माझे वडील भाजपचे एकेकाळी अध्यक्ष होते, मी लहानपणापासून संघाचे काम करीत होतो याचे दाखले देण्यास ते विसरले नाहीत. यावर कडी म्हणजे राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजित पवार हे देखील आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याकडे आ.सचिन पाटील, फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर व सर्व पदाधिकारी यांनी देखील अजित दादांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली व फलटण येथील कार्यक्रमाला पूर्ण दिवसभर हजेरी लावून आपण भाजपाशी किती प्रामाणिक आहोत हे राष्ट्रवादीच्या आमदार व पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले त्यामुळे त्यामुळे फलटणची राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला बांधली आहे की, काय असा सवाल भोंडवे यांनी केला आहे.
Back to top button