ताज्या घडामोडी

निवड पं.स.सभापती, उपसभापती पदाची : तर त्रास मात्र रूग्णांना व स्थानिक व्यापाऱ्यांना..

(फलटण /प्रतिनिधी) -फलटण पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण पंचायत समिती शेजारी असलेल्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौज फाटा बोलाविण्यात आला होता. निवडणूक ठिकाणापासून जवळपास ५० मीटर अंतरावर चारी बाजूला मोठी बॅरागेटिंग उभारण्यात आली होती.

प्रशासनाने एवढा बंदोबस्त का ठेवला होता याचे मात्र अद्याप कोडे उघडले नाही.त्यामुळे उगीचच संपूर्ण परिसरात व फलटण शहरात तणावपूर्ण व भीतीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

खरंतर एवढ्या बंदोबस्ताची काही गरजच नव्हती शेवटी निवडणूक तर बिनविरोधच व शांततेच्या वातावरणात पार पडली मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या या कारभारामुळे जिल्हा उपरुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ये-जा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागला.

पंचायत समिती जवळील अनेक रस्ते बंद केल्याने काही वेळा वाहतुकीला मोठा अडथळा येत होता. त्यामुळे अनेकांची गैरसोय ही मोठ्या प्रमाणात झाली मात्र गर्दीची कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याकडे पोलिसांचे लक्ष देखील नव्हते.

याशिवाय पंचायत समिती सभागृहाच्या परिसरातील हॉटेल, दुकाने व इतर व्यापारी व्यवसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे व हॉटेल व्यावसायिकाचे आर्थिक नुकसान झाले व त्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण दिसून आले.

विशेष म्हणजे ही निवडणूक अखेरीस बिनविरोध पार पडली. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त उभारून व्यापारी, रुग्ण आणि पोलिस यंत्रणेवर ताण का आणण्यात आला, असा प्रश्न शेवटी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button