ताज्या घडामोडी

परेश-समीक्षा दांम्पत्यास यंदाचा ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेकजागर पुरस्कार’ जाहीर

फलटण प्रतिनिधी-  तत्त्वबोध विचार मंचाच्या वतीने देण्यात येणारा ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेकजागर पुरस्कार- 2024’ विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविणारे दाम्पत्य परेश जयश्री मनोहर व सौ. समीक्षा संध्या मिलिंद यांना जाहीर करण्यात आला आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे ह्या पुरस्काराचे स्वरूप असून दि. 27 ते 29 डिसेंबर रोजी 9 सर्कल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेक व्याख्यानमाले’त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी सदस्य तथा जेष्ठ पत्रकार श्री रवींद्र बेडकिहाळ यांचे हस्ते तो प्रदान करण्यात येणार आहे.

प्राचार्यांच्या स्मरणार्थ ही विवेक व्याख्यानमाला गेल्या 13 वर्षांपासून ‘तत्त्वबोध विचार मंच, 9 सर्कल’ आयोजित करत असून सन 2016 पासून ‘विवेकजागर पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे. विविध मार्गांनी विवेकाचा जागर करणार्‍या, समाजास विवेकशील बनविण्याचा प्रयत्न करू पाहणार्‍या व्यक्तीस प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सुरु करण्यात आला असून आजवर तत्त्वज्ञान, समता चळवळ, मनोरुग्ण सेवा, पर्यावरण पत्रकारिता, अभ्यासपूर्ण लेखन अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांस हा पुरस्कार दिला गेला आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेले ‘परेश आणि समीक्षा’ हे दाम्पत्य साहित्य-कला प्रसार-प्रचाराचे कार्य मोठ्या तळमळीने वाघळवाडी (सोमेश्‍वरनगर) परिसरात करत आहे. ‘तुळशी कट्टा’ हा विविध कलाप्रकार जोपासण्याचा, साहित्यास प्रोत्साहन देण्याचा कृतीशील प्रयोग ते राबवत असल्याने त्यांस हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मंचाच्या वतीने सचिन शिंदे यांनी सांगितले. दि 27 ते 29 डिसेंबर 2024 दरम्यान 9 सर्कल, साखरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात होणार्‍या ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेक व्याख्यानमाले’त सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रंथदिंडीने सुरुवात होणार्‍या व्याख्यानमालेचे दि 27 रोजी सायं 7 वाजता श्री तुळशीदास बागडे, पर्यवेक्षक, साखरवाडी विद्यालय यांचे हस्ते उद्घाटन होऊन आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. आप्पासाहेब खोत, सांगली यांचे विनोदी कथाकथन होणार आहे.
दुसर्‍या दिवशी 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ‘तेंडल्या’ ह्या चित्रपटाचे प्रदर्शन आणि त्यानंतर त्याचे दिग्दर्शक सचिन जाधव, सहाय्यक दिग्दर्शक मंगेश बाबू व सर्वेश भाले यांच्याशी चर्चा-प्रश्‍नोत्तरे होणार असून त्यामध्ये चित्रपट माध्यमाची सांगोपांग माहिती दिली जाणार आहे. त्याच दिवशी 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ‘शोध हरवलेल्या लोकधारेचा’ हे आपल्या लोकजीवनात एकेकाळी रुजलेल्या पण आजकाल विसर पडलेल्या गीतमय वारशाची आठवण करून देणारे ‘गीतमय’ व्याख्यान मुंबई येथील पत्रकार, लेखक मुकुंद कुळे सादर करणार आहेत. यावेळी माणदेशी कवी, साहित्यिक ताराचंद आवळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तिसर्‍या दिवशी दि 29 डिसेंबर रोजी सायं 7 वा. पुरस्कार प्रदान सोहळा असून जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ ‘अभिजात मराठी आणि आपली जबाबदारी’ ह्या विषयावर बोलणार आहेत. नागरिकांनी अशा वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश असलेल्या व्याख्यानांचा लाभ घेण्याचे आवाहन तत्त्वबोध विचार मंचाचे भरत माने, महेश यादव, स्वप्निल बनकर यांनी केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.