फलटण (प्रतिनिधी) -जगाकडून एखादयाने काय घेतलं म्हणून त्याचा सन्मान होत नसतो तर त्याने जगाला जे काही दिलं, त्याबद्दल त्याचा सन्मान होत असतो.अशाच प्रकारे आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या श्रीमती गंगुबाई मोहनलाल तेली या आजींनी वयाची ९७ वर्षे पूर्ण करून शताब्दी कडे वाटचाल सुरू केली आहे.
याबद्दल वयाच्या ९७ व्या वर्षी, तेली बुधवार पेठ फलटण येथील त्यांची मुले उदय तेली, गजानन तेली, व राजू तेली व संपूर्ण समाजाकडून श्रीमती गंगुबाई मोहन तेली यांचा मोठ्या थाटामाटात गुळ तुला करून सन्मान करण्यात आला.
एकीकडे समाजामध्ये अशी अनेक उदाहरणे पहावयास मिळतात की, आपले आई-वडील म्हातारपणी थकल्यानंतर त्यांना न सांभाळता वृद्धाश्रमामध्ये पाठवले जात आहे. खरंतर या वयामध्ये आपल्या आई-वडिलांना मुलाबाळांच्या आधाराची गरज असते परंतु याचा कोणताही विचार न करता आजच्या समाजातील काही मुले आपल्या आई-वडिलांना साथ देताना दिसत नाहीत.
परंतु समाजामध्ये अशीही काही उदाहरणे आहेत की आज उदय तेली, गजानन तेली व राजू तेली यांनी आपल्या आईच्या 97 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या आईचा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करून तिची गुळतुला करून हजारो लोकांना मिष्ठांन भोजन दिले. हे बोलके उदाहरण समाजामध्ये निश्चितच अनेकांना प्रेरणादायी असे आहे अशी प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी दिली.
श्रीमती गंगुबाई तेली यांना शुभेच्छा देण्यासाठी फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. पांडुरंग गुंजवटे, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री. सुदामराव मांढरे, फलटण नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. वैशाली चोरमले, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, फलटण नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती चंद्रकांत शिंदे फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर सिंह ना. निंबाळकर इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते

गंगुबाई तेली यांना लाडाने बुढी आई म्हणतात. बाहेरचे लोकही तिचा खूप आंदर करतात. तेही तिला काकी किवा माळवरची काकी असे म्हणतात. आज 97 वर्षाच्या असणाया गंगुबाई तेली यांचा जन्म 1927 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी झाला. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ श्रीमती गंगुबाई तेली यांनी जवळून पाहिला आहे.
स्वातंत्र्य लढ्याचे अंगावरती शहारे आणणारे अनेक किस्से आम्हाला अजूनही मोठ्या अभिमानाने त्या सांगतात त्यांच्याशी बातचीत करीत असताना त्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगतात की,1972 च्या दुष्काळात लोकांचे झालेले हाल व उपासमार सांगताना आजही आजीच्या डोळयांत पाणी येते. माणसांची अवस्था जनावरांपेक्षाही वाईट झाली होती, हे गंगुबाई तेली यांच्याकडून ऐकताना अंगावर काटे उभे राहतात.

श्रीमती गंगुबाई तेली यांनी आपल्या मुलाबाळांना अतिशय हलाकीच्या परिस्थिती सांभाळत असताना आपल्या गरिबीशी व परिस्थितीशी झगडत त्यांनी तब्बल ४0 वर्षे भाजीपाला विकला काबाडकष्ट करत असतानाही तिचे संपूर्ण लक्ष आपल्या पोराबाळांवरच असायचे. अगदी लहानपणापासूनच त्यांच्या वाटेला आलेला हा कष्टाचा व संघर्षाचा हिमालय त्यांनी न थकता अविरतपणे सर करत राहिल्या

गंगुबाई यांना १ मुलगी १ जावई. तसेच 3 मुले व 3 सुना, ७ नातवंडे व ६ नाथ सुना तसेच एकूण 12 परतुंडे असा समृद्ध कौटुंबिक वारसा लाभलेला आहे. आजी या सर्वांनाच अगदी मनापासून जीव लावतानापहावयास मिळते. अधिकची माहिती घेताना श्रीमती गंगुबाई मोहनलाल तेली यांच्या नातवांशी चर्चा केली असता ती नातवंडे म्हणतात की, आमची आजी तशी खूप हौशी आहे.

आजी म्हणजे आमच्या समाजातील एक चालतं- बोलतं विद्यापीठच आहे. कारण आजीला प्रत्येक सण, सर्व चालीरिती, परंपरा हे सर्व काही अचूकपणे माहित आहेत व आजीच्या या स्वभावामुळेच घरामधील वातावरण नेहमीच आनंददायी व सुसंस्कारीत राहिलेले आहे. आजीमुळेच आज आमच्या घरच्याला व आमच्या जगण्याला एक सुंदर असा अर्थ प्राप्त झाला आहे.
आजीने तिच्या आयुष्यात एवढा मोठा संघर्ष केला आहे की, कितीही अवघडातला अवघड निर्णय आजी अगदी सहजपणे व अचूकपणे घेते. त्यामुळेच की काय.? सुख असो वा दुःख असो, अनेक लोक आजीकडे सल्ला मागण्या साठी येतात. एखादी समस्या आजीला सांगावी व आजीने त्यावर पटकन रामबाण उपाय शोधावा, व येणारा हसतमुखाने माघारी जावा, हे एक समीकरणच होऊन बसलेले आहे.
याला प्रमुख कारण म्हणजे आमची आजी खूप हजर जबाबी आणि स्पष्टवक्ती आहे. एखादयाचे काय चुकले ? काय बरोबर आहे ? कोणती गोष्ट, कोणत्या पद्धतीने करावी? याविषयी आजी अचूकपणे व समोरच्या व्यक्तीच्चा तोंडावरच मार्गदर्शन करते.
या तिच्या एकूण अनुभवाचा कित्येक लोकांना फायदा झाला आहे. कारण आजही आजीने दाखवलेल्या मार्गा मुळे पुढे गेलेले व यशस्वी झालेले लोक जेव्हा आमच्या समोर आमच्या आजीच्या पण्यावरती डोकं ठेऊन पाया पडतात तेव्हा घरातील सर्वांनाच कृत-कृत्य व धन्य-धन्य झाल्यासारखं वाटत.
आजीची दुसऱ्यांना समजावून सांगण्याची व दुसऱ्याना समजून घेण्याची पद्धत तर आमच्या मनावरती राज्यच करून जाते. आजीच्या या आपुलकी मुळे आजी सर्वांनाच हवीहवीशी वाटते, ते यावरून समजते.

आजीने कठोर व अतोनात मेहनत करून हालअपेष्टा सहन करून आम्हाला गरीबीतून बाहेर तर काढलंच, पण आमच्यावरती उत्तम व आदर्श संस्कार करायला व आम्हाला घडवायलाही आजी कुठेच कमी पडली नाही. आज आम्ही जे पण कुणी आहोत, ते आमच्या आजीमुळेच आहोत. व आजीच्या या संस्कारांमुळेच आम्ही आज यशस्वीरित्या इथपर्यंत पोहोचलो आहोत.

माझ्या आजीचा मला सर्वाधिक आवडणारा गुण म्हणजे इतरांबद्दल नेहमी चांगलाच विचार करणे व इतरांना नेहमी मदत करणे. कुणी कसंही असलं तरी आपण मात्र आपला चांगुलपणा विसरायचा नाही, हे आजीकडून खूप शिकण्यासारखं आहे.

‘ जे – जे ‘आपणासी ठावे..। ते – ते इतरांसी सांगावे शराणे करूनी सोडवि…। सकलजन या सिद्धांताला आजी प्रमाण मानते. म्हणून मला तिच्याविषयी खूपच अभिमान वाटतो. आज आमची आजी 97 वर्षांची असूनही आजही तरुणाईला लाजवेल असा तिचा आत्मविश्वास आहे. अजूनही ती कामामध्ये सतत पुढे असते. आयुष्यभर कष्ट भोगलेल्या या माझ्या आजीला अजूनही काम करण्याची सवय आहे. साध राहणीमान परंतु उच्च विचारसरणी असलेली माझी आजी अजूनही तेवढीच कणखर आहे, शरीरानेही आणि मनाने ही.

आजी म्हणजे दुसरी आईच. आईप्रमाणेच आमच्यावर जीव लावणाऱ्या आमुच्या आजीचा सहवास आम्हाला आयुष्यभर लाभत राहो. म्हणजेच आमच्या यशाचा वेगाने धावणारा वारू आणखीच वेगाने धावेल. आजी तू काही गोष्टी बोलत नाहीस. पण तुझ्या मनात आमच्या विषयी खूप काही स्वप्न आहेत. पण आजी, तुला एक शब्द देतो की, तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न आम्ही जीवाचं राज करून पूर्ण करू. आमचे यश पाहून तुझ्या डोळयात येणारे आनंद आश्रु हेच आमच्यासाठी सर्वांत मोठा पुरस्कार व सर्वांत मोठ्या विजयाचा सोहळा ठरतील.
आज 97 वर्षाच्या माझ्या आजी आम्हा सर्वा वरतीच तिच्या अखंड प्रेमाची व आशिर्वादाची पुष्प वृष्टी होत राहो, एवढीच ईश्वरचरणी मनस्वी प्रार्थना सर्व नातवांडे करीत आहेत.
Back to top button
कॉपी करू नका.