ताज्या घडामोडी

* फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना जिल्हास्तरीय आदर्श अधिकारी पुरस्कारासाठी निवड : विविध स्तरावरुन अभिनंदन*

फलटण प्रतिनिधी-: महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी महसूल पंधरवड्याच्या निमित्ताने राज्यातील महसूल अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या आदर्श अधिकारी पुरस्कारांची घोषणा झाली असून जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा समावेश असून पुरस्काराची घोषणा होताच अनेकांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील दि. ६ सप्टेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी महसूल दिनी उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी यांचा सन्मान करणेकामी मागविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार सातारा जिल्ह्यातील प्रत्येक उपविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्येक शाखेतून शासन निर्णयातील नमूद संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामधून पुरस्कारासाठी निवड झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांना सदर पुरस्कार देवून सन्मान पूर्वक गौरविण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात विभागस्तरीय पुरस्कारासाठी ४ आणि जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी २० अधिकारी/कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये फलटण उपविभागातून फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची निवड करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी फलटण उपविभागातील सर्व शासकीय यंत्रणांचा उत्तम समन्वय ठेवून विविध शासकीय योजना प्रभावी रीतीने राबविताना योग्य लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा या विभागात सुमारे ३ दिवस वास्तव्यास असतो त्या मध्ये येणाऱ्या लक्षावधी वारकरी, दिंडीकरी, भाविक, भक्त मंडळींना आवश्यक नागरी सुविधा प्राधान्याने, वेळेवर, योग्य प्रमाणात मिळाल्या पाहिजेत, उपविभागातील तरडगाव, फलटण, बरड येथील पालखी तळावरील आणि परिसरातील वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, सुरक्षा या सुविधांचे योग्य नियोजन, त्याचप्रमाणे माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या अबाल वृध्दांना व्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करण्यात प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केलेले नियोजन आणि सर्व सबंधीत यंत्रणांच्या माध्यमातून केलेली अंमलबजावणी कौतुकास्पद ठरली आहे.
लोकसभा निवडणूक
दरम्यान २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी केलेले नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीचे सर्वांनीच कौतुक केले.
आळंदी – पंढरपूर – मोहोळ राष्ट्रीय महामार्ग (पालखी मार्गाचे) या उप विभागातील पूर्ततेसाठी प्रामुख्याने भुसंपादन व तत्सम प्रक्रिया पूर्ण करताना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी ठोस भूमिका घेऊन केलेल्या नियोजनामुळे पालखी सोहोळा या मार्गावरुन सुरळीतपणे मार्गस्थ झाला, विशेषतः सोहळ्याच्या वाटचालीतील पहिले उभे रिंगण होत असलेल्या चांदोबाचा लिंब येथील पुरातन मंदिर स्थलांतर व त्याची पुर्नउभारणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सर्वांच्या समन्वयातून अत्यंत उत्तम प्रकारे सोडविला, तर तरडगाव परिसरातून जाणाऱ्या पालखी महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करुन घेण्यात त्यांची कार्यकुशलता सर्वांनीच अनुभवली आहे.
फलटण – बारामती नवीन रेल्वे मार्ग आणि पुणे – मिरज रेल्वे मार्ग दुहेरी करण कामासाठी भूसंपादन, फलटण – बारामती मार्गाचे प्रलंबीत काम सुरु करण्यासाठी असलेल्या अडचणी सोडविणे व सदर काम गतिमान करणे, विविध पाटबंधारे प्रकल्प व वीज पारेषण वाहिनी भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घेतलेली भूमिका प्रेरणादायी ठरली आहे.
जुलै २०२३ ते मे २०२४ या कालावधीत उपविभागात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, आवश्यक तेथे टँकरने पाणी पुरवठा, चारा टंचाई निवारणार्थ चारा उत्पादन वगैरे बाबी नियोजन पूर्वक केल्याने पशू धनाची संख्या मोठी असतानाही चारा डेपो अथवा चारा छावण्यांची आवश्यकता भासली नाही.
या सर्व बाबी सांभाळताना प्रशासकीय कामकाजात कोठेही कमतरता जाणवली नाही हे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या नियोजनामुळे संपूर्ण उप विभागातील महसूल यंत्रणा नियमीत कामातही कोठे कमी पडली नाही. तालुका व उपविभाग स्तरावर ई – ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले देणे कामी मंडल, तालुका आणि उपविभागीय स्तरावर उत्तम नियोजन करुन वेळेत दाखले देण्यात फलटण उपविभाग आघाडीवर राहिला आहे.
एकूणच प्रांताधिकारी म्हणून काम करताना केवळ महसूल यंत्रणा नव्हे तर उप विभागातील संपूर्ण प्रशासन यंत्रणा पूर्णतः लोकाभिमुख कशी राहील कोणाचेही काम कोठे अडणार नाही यासाठी सर्वांशी योग्य समन्वय ठेवणारा अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याविषयी सर्व स्तरावर आदराची भावना व्यक्त होत असते.
जिल्हास्तरीय आदर्श अधिकारी पुरस्कारासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांची निवड निश्चित योग्य आणि प्रेरणादायी आहे. त्यांचे अभिनंदन !

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.