फलटण प्रतिनिधी – शांती, समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतुने भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५४ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५५ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २,५०० किलोमीटरच्या काढण्यात आलेल्या रथ व सायकल यात्रेची मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात सांगता झाली. या सायकल यात्रेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे १०० सायकल यात्रींनी सहभाग नोंदविला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचला तर संत तुकाराम महाराज या धर्माचे कळस झाले . संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांनी उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला व भागवत धर्माची पताका फडकावली. पंजाबमधील शीख धर्मीयांमध्ये आपल्या सात्त्विक विचारांचा प्रभाव तेवत ठेवला. मुगल सम्राट फिरोजशा तुघलक यांनी श्री क्षेत्र घुमाण येथे संत नामदेव महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर उभारले . या पार्श्वभूमीवर अध्यात्मिक क्षेत्रातील विश्वातील पहिल्या रथ व सायकल यात्रेला
श्री विठ्ठल भक्तीचा तसेच शांती , समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ , नामदेव समाजोन्नती परिषद व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण अशी भव्य रथ व सायकल यात्रा २०२२ पासून सुरु करण्यात आली . यात्रेचे हे तिसरे वर्ष होते .
५० वारकरी तर १०० सायकल यात्रींचा सहभाग
संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील सायकलस्वारांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. विविध राज्यांतील भाविकांची मागणी आणि संत नामदेव महाराजांच्या शांती, समता व बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी यंदाही भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद , श्री नामदेव दरबार कमिटी घुमाण ( पंजाब ) व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संस्था-संघटनांच्या वतीने ही यात्रा १२ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) कडे प्रस्थान केले होते . या यात्रेत सुमारे ५० वारकरी व १०० सायकलयात्री सहभागी झाले होते , ही यात्रा महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , हरियाणा मार्गे पंजाब राज्यातील संत नामदेव महाराजांची कर्मभूमी असलेल्या गुरुदासपूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घुमाण येथे ४ डिसेंबर रोजी पोहोचली.
नामदेव समाजाकडून देशभरात उत्साही स्वागत
संत नामदेव महाराजांच्या रथ व सायकल यात्रेचे महाराष्ट्रासह गुजरात , राजस्थान , हरियाणा , पंजाब राज्यात मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करणार आले. भाविकांनी पादुकांची पूजा व सायकल यात्रींचा सन्मान करीत यात्रेस शुभेच्छा दिल्या. श्री क्षेत्र घुमाण येथे ५ डिसेंबर रोजी सायकल यात्रेचा समारोप झाला . त्यानंतर ही रथयात्रा पंजाब , हरियाणा , दिल्ली , उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश राज्यातुन प्रवास करीत दि . १२ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचली.
*पंढरपूरच्या नामदेव मंदिरात विधीपुर्वक सांगता*
संत नामदेव महाराजांची जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे संत नामदेव परिवाराकडून मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात यात्रेचे स्वागत करण्यात आले. संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास एकनाथ महाराज नामदास, माधव महाराज नामदास, ज्ञानेश्वर महाराज नामदास, केशव महाराज नामदास, कृष्णदास महाराज नामदास आदी यावेळी उपस्थित होते .
पाटण जि सातारा येथील माउली प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपकसिंह पाटणकर , यशश्रीदेवी पाटणकर यांच्या हस्ते संत नामदेवांच्या पादुकांची विधीवत पूजा करुन आरती व महाप्रसादानंतर नामदास परिवाराचा व सोहळ्यात सहभागी वारक-यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला महाप्रसादाने यात्रेची सांगता करण्यात आली.
या सोहळ्याचे नियोजन नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवसकर, सचिव डॉ. अजय फुटाणे, उपाध्यक्ष रविंद्र रहाने, विश्वस्थ वसंतराव खुर्द, पंकज सुत्रावे, सीमा नेवासकर, वैष्णवी नेवासकर,भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, सदस्य सुभाष भांबुरे, राजेंद्र मारणे, राजेंद्रकृष्ण कापसे, राज्य समन्वयक खेमराज नामा (राजस्थान) मुलचंदजी परमार (गुजरात), सिताराम टांक (राजस्थान), सरबजितसिंह बावा (पंजाब), प्रेमसिंह अग्रोईया (हरियाणा), महेंद्र लड्डा (दिल्ली), किशनसिंह राजपूत (उत्तर प्रदेश) अशिष नामदेव (मध्यप्रदेश) आदीनी केले होते .
Back to top button
कॉपी करू नका.