फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – आळंदी-पंढरपूर महामार्गावर वडजल (ता. फलटण) गावच्या हद्दीत रस्त्यावरील खड्डा चुकवताना झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज पालखी महामार्गावर येऊन काही काळासाठी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यापूर्वी वडजल ग्रामस्थांनी काल आजच्या रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना निवेदन दिले होते. संबंधित निवेदनाची दखल घेत श्रीमंत रामराजे यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर कालपासून प्रशासनाने अपघात टाळता यावा यासाठी योग्य त्या दुरुस्त्या करावयास सुरुवात केली होती. तरीदेखील आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी उडान पूल करण्यात यावा यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले होते. पुणे पंढरपूर हा महामार्ग असल्यामुळे काही वेळातच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या खूप मोठ्या रांगा लागल्या होत्या. तात्काळ प्रशासनाने ग्रामस्थांशी यशस्वी चर्चा करून अपघात कशा पद्धतीने टाळता येईल यासाठी योग्य ती कार्यवाही सुरू केली असून अजून याच्यामध्ये काय करता येईल का हा विचार चालू असल्याचे सांगितले.
यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते.यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही काही काळानंतर रस्ता रोको थांबल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली.