ताज्या घडामोडी

प्रशासनाने दखल न घेतल्यास वडजल ग्रामस्थ करणार रास्ता रोको आंदोलन

प्रशासनाने दखल न घेतल्यास शुक्रवार दि.२२ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करणार

फलटण- आस्था टाईम्स वृत्तसेवा – आळंदी-पंढरपूर महामार्गावर वडजल (ता. फलटण) गावच्या हद्दीत रस्त्यावरील खड्डा चुकवताना झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊन, जर २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास विश्वास बाळासो पिसाळ (वय २३, रा. वडजल) हे आपल्या दुचाकीवरून जात होते. रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विश्वास हे आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते होते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अपघाताला सर्वस्वी प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आळंदी-पंढरपूर महामार्गावर वडजल परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यावरील पथदिवेही बंद आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर याच खड्ड्यांमुळे एका निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.