फलटण प्रतिनिधी- काही दिवसांपूर्वी कामानिमीत्त पुण्याला गेलो होतो. त्यावेळी आलेला एका चिमुरडीचा अनुभव मनाला थक्क करून गेला. लगेच मी भानावर आलो तो अनुभव असा होता तो मी माझ्या लेखणीतून उतरविला आहे. सकाळचे दहा साडे दहा वाजले असतील. नेहमीप्रमाणे रस्त्यावर गाड्यांची वर्दळ दाट होती. त्यात मी माझी गाडी संथगतीने गंतव्यस्थानाच्या मार्गाने चालवत होतो.तेवढ्यात समोरच्या चौकात ट्रॅफिक सिग्नलवर लाल दिवा लागला आणि रस्त्यावरील संपूर्ण वर्दळ क्षणातच स्तब्ध झाली.
थांबलेल्या वर्दळीचा फायदा घेऊन लगेच रस्त्याच्या दुतर्फा बाजुने फेरीवाल्यांचा ताफा त्या थांबलेल्या गर्दीत घुसला. कुणी खेळणी तर कुणी फळं तर कुणी खाद्यपदार्थ तर कुणी गृहोपयोगी वस्तु त्या गर्दीत विकू लागले होते. तेवढ्यात लाल दिव्याच्या खालुन एक चिमुरडी पोर येताना दिसली. ८-१० वर्षांची असेल. कपडे मळलेले, विस्कटलेले केस, निस्तेज कांती, केस भुरकट तपकिरी रंगाचे. पोटाचे खळगे कधीही नीट भरत नसल्याचे तिच्या अवतारावरून समजत होते. कुपोषणाचा नमुनाच. हातातील ओझे सावरत सिग्नलवर उभ्या असलेल्या एका मागून एका गाडीच्या खिडकीतून आत डोकावत होती. आत बसलेल्यांकडे आपल्या जवळील वस्तु घेण्यासाठी मोठ्या आशेने पाहत होती, विनवणी करत होती. समोरील चार गाड्यांपैकी एकानेही काच खाली केली नाही. ती पण खिन्न न होता पुढच्या गाडीकडे वळत माझ्याकडे येउ लागली. हीने सकाळपासून काही खाल्ले तरी असेल का? वाटत नाही. हीचे आईवडील काय करत असतील? मझ्या माहीच्याच वयाची पोर कसं होणार हीचं? असे अनेक विचार मनात येउ लागले आणि काळजाला अक्षरशः पिळ पडला. ती जवळ येताच मी खिडकीची काच खाली केली तसे तीने हातातील वस्तू माझ्याकडे सरसावली. डस्ट बिनच्या कॅरीबॅगचे पाकीट होते ते. मी वॅालेटमधुन शंभर रुपयाची नोट काढून तीच्या हातात दिली तसे ती आणखी दोन पाकीटं देऊ लागली. त्या कॅरीबॅग्ज माझ्या काहीही कामाच्या नव्हत्या. मी तिला म्हणालो “मी काय करू हे घेउन, याचा मला काही उपयोग नाही हे तुच ठेव.” मी दिलेली शंभरची नोट ती मला गोंधळलेल्या नजरेने दाखवू लागली. मी पुन्हा तीला म्हणालो “जा बाळ काहीतरी खाऊन घे.“ क्षणभर विचार करत तिने हातातील पाकीटं माझ्या पुढ्यात जबरदस्तीने ठेवली आणि म्हणाली *“लेना पडेगा साहब, भीक नही चाहीये!”* आणि पुढच्या गाडीकडे वळाली. तीच्या त्या वाक्याने मला चांगलीच चपराक बसली, माझे भान हरपून गेले. सिग्नल सुटला होता, पुढच्या गाड्या निघून गेल्या होत्या आणि मागच्या गाडीच्या हॉर्नने मला भानावर आणलं खरं पण तिचे ते वाक्य आजही कानात घुमत राहते.
Back to top button
कॉपी करू नका.