ताज्या घडामोडी
दिल्लीच्या विदुशी नबनिता चौधरी यांची फलटण येथे शास्त्रीय गायन मैफल

फलटण प्रतिनिधी- श्रीमंत मालोजीराजे स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत उदयसिंहराजे व श्रीमंत विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 24 रोजी शास्त्रीय गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीत पद्मभूषण पंडित राजन साजन मिश्रा यांच्या शिष्या व बनारस घराण्याच्या दिल्ली येथील सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका विदुशी नबनिता चौधरी यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे.
या मैफलीत विदुशी नबनिता चौधरी प्रारंभी रागदारी सादर करतील त्यानंतर दादरा, ठुमरी गायन होईल आणि नंतर उपशास्त्रीय गायनात हिंदी गझल, मराठी भक्तीगीत, नाट्यगीत व अभंग सादर होईल.
विदुशी नबनिता चौधरी यांना पद्मभूषण विदुषी शोभा गुर्टू व पंडित दीपक चटर्जी यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. विदुशी नबनिता या आकाशवाणी व दूरदर्शनच्या ‘ए’ श्रेणी गायिका असून आतापर्यंत त्यांनी भारतातील विविध संगीत महोत्सवात अनेक ठिकाणी आपली कला सादर केली आहे. याशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड, कॅनडा, सिंगापूर, व्हियतनाम, मलेशिया व बांग्लादेश, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ या देशामध्येही त्यांनी आपली गायन कला सादर केली आहे.