फलटण प्रतिनिधी- खरंतर मी मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स व खो-खो स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदा २००२ साली खेळावयास आली होती तेव्हापासून तीन ते चार वेळा या मैदानावर खेळली आहे. त्यामुळे तेव्हापासून ते आजपर्यंत या महाविद्यालयाशी माझी नाळ जोडली गेली आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धावपटू तथा उपजिल्हाधिकारी सौ. ललिता बाबर भोसले यांनी केले.

मुधोजी महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ललिता बाबर भोसले बोलत होत्या. याप्रसंगी फलटणचे युवा नेते श्रीमंत अनिकेत राजे ना. निंबाळकर फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे
मुधोजी महाविद्यालय प्रशासन समितीचे सदस्य डॉ. पुरुषोत्तम राजवैद्य, सी.डी.पाटील सर मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच.कदम सर, सातारा जिल्हा ॲम्युचर खो- खो असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा खो-खो चे राष्ट्रीय खेळाडू कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, उपप्राचार्य डी.एम. देशमुख, डॉ. टी. पी. शिंदे, ,डॉ. धनवडे स्वप्निल पाटील,तायाप्पा शेंडगे व प्रा. दिलीप शिंदे, प्रा. उमा भोसले मॅडम, प्रा. सिता जगताप मॅडम इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे ललिता बाबर म्हणाल्या की, मी खेळत असताना पाहिले की, अनेक ग्रामीण भागातील मुलं मुली नॅशनल, इंटरनॅशनल पातळीवर दैदीप्यमान कामगिरी करीत आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या वेळची परिस्थिती ही एवढी आम्हाला अनुकूल नव्हती घरातूनही आर्थिक परिस्थितीमुळे पाहिजे एवढा सपोर्ट मिळत नव्हता मी एका शेतकऱ्याची मुलगी माण तालुक्यातील मोही गावांमध्ये एका वस्तीवर राहत होती.
वस्तीवरून मी दररोज साडेतीन किलोमीटर पळतच मैदानावर यायचे आणि त्या ठिकाणी सराव करायचे माझे वडील हे ड्रायव्हर असल्यामुळे आर्थिक परिस्थिती खूप खराब होती.
अशाही परिस्थितीत मला माझ्या वडिलांनी आईने व काकांनी मानसिक दृष्ट्या पाठबळ दिले आणि त्यामुळेच मी हे यश संपादित करू शकले. त्यामानाने आजच्या मुलांना व मुलींना खेळासाठी अनुकूल परिस्थिती आहे. घरातील लोकांचेही मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत आहे.
त्याचबरोबर सोयी-सुविधा प्राप्त आहेत. अशा परिस्थितीत आपण अपार कष्ट करून देशाला निश्चितपणे भविष्यात ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदक मिळवून द्याल अशी अपेक्षा या निमित्ताने करीत असताना मी ज्यावेळी ऑलम्पिक खेळून आले त्यावेळी तत्कालीत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी माझा फलटण येथे मोठा जंगी सत्कार ठेवला होता व माझी मिरवणूक देखील काढली होती.
त्यामुळे मला मोही माण एवढेच प्रेम फलटणकरांनी दिले असल्याचे सांगून बाबर म्हणतात की मी महाराजसाहेब यांचेकडे ओ.एस.डी. म्हणून काम करीत असताना श्रीमंत रामराजे साहेब नेहमी सांगायचे की, या मुलीचे ऑलिंपिक मधील सुवर्णपदक थोडक्यामध्ये गेले आहे.
याची वारंवार मला खंत वाटते एवढे प्रेम श्रीमंत रामराजे यांच्याकडून मला मिळाले त्यामुळे मी भारावून गेले त्याचबरोबर २००८ ला मी नॅशनल खेळले मला गोल्डमेडल प्राप्त झाले. एशियन स्पर्धेमध्ये देखील मला गोल्ड मेडल मिळाले.

नंतर ऑलिंपिक स्पर्धेसाठी माझी निवड झाली ऑलम्पिक स्पर्धेच्या अगोदर जो काही सराव करावा लागला त्याबाबतीत सांगताना बाबर म्हणतात मी आठवड्याला जवळपास २६५ किलो मीटर रनिंग करायची त्याचबरोबर आठवड्यातील प्रत्येक रविवारी माझ्याकडून ८० ते ८५ किलोमीटर रनिंग करून घेतले जायचे.
एवढी अपार मेहनत केल्याशिवाय ऑलिंपिकचे पदक शक्य नव्हते. माझे कोच बिगर भारतीय होते. त्यांनी आमच्यावरती अनेक बंधने आणली होती. यामधील प्रामुख्याने आहाराच्या बाबतीत तर आम्हाला खूप रिस्ट्रीशन होते. अशावेळी मला वाटायचे की तुरुंगातील अन्न देखील चांगले असते अशा पद्धतीने आम्हाला शिजवलेले आणि उकडलेले अन्न भाज्या दिल्या जायच्या
त्यामुळे कधी कधी असे वाटायचे की कशासाठी ही आपण शिक्षा भोगतोय परंतु नंतर लगेच डोक्यात विचार यायचा की हे सगळं स्पर्धेमधील चांगली कामगिरी करण्यासाठी होते याची जाणीव मात्र मला होती त्यामुळे कितीही अपार कष्ट करावे लागले तरी ऑलिंपिक पदक जिंकायचे या जिद्दीने मी त्या ठिकाणी सराव करीत होते.

खरंतर तुम्हा सर्व खेळाडूंना एक चांगली संधी प्राप्त झाली आहे माझ्याबरोबर ज्यांनी सराव केला ते तायाप्पा शेंडगे सर हे आणि मी दोघे मित्र आहोत आम्ही दोघे एकत्र सराव केला आहे तसेच खेळलो आहे. तायाप्पा शेंडगे यांनी देखील नॅशनल स्पर्धेमध्ये पदके प्राप्त केली आहेत असे कोच तुम्हाला मिळाले आहेत य हे तुमचे भाग्य आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.

असे सांगून पुढे त्या म्हणतात आज प्रशासकीय सेवेमध्ये काम करीत असताना प्रशासनातला देखील आपणाला अनुभव असावा लागतो.
मात्र प्रशासनापेक्षा मला एक खेळाडू म्हणून जेवढी काही प्रसिद्धी मिळाली ती प्रसिद्धी कशामुळेच मिळू शकत नाही.
तरी जाता जाता एवढेच सांगते की, मी ज्या मातीतून पुढे गेली त्याच मातीतून अनेक खेळाडू पुढे यावेत व आपल्या देशाचा ध्वज त्यांनी देशभर उंच करावा कारण मी अनेक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदके मिळविली त्याचबरोबर एशियन स्पर्धेमध्ये सुद्धा मला सुवर्णपदक मिळाले
मात्र ऑलिंपिकच्या स्पर्धेमध्ये माझे सुवर्णपदक अगदी थोडक्या फरकाने मला गमवावे लागले कारण नेमक्या अंतिम सामन्या अगोदर मला दुखापत झाली होती आणि त्यामुळेच अगदी थोडक्या फरकाने मी सुवर्णा पदकापासून दूर राहिले व आपल्या देशाचे एक सुवर्णपदक आपल्या हातून निसटले याची खंत आजही मला आहे.
आणि तीच खंत या महाविद्यालयातील खेळाडूंनी भविष्यात पूर्ण करून आपल्या देशाला अथलेटिक्स या विभागांमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून द्यावे व आपल्या देशाचा ध्वज संपूर्ण जगभर फडकवावा अशी अपेक्षा यानिमित्ताने मी आपणापुढे व्यक्त करीत आहे आणि ती अपेक्षा आपण पूर्ण कराल असा विश्वासही मला वाटतो असेही शेवटी आपल्या भाषणात ललिता बाबत म्हणाल्या.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली नंतर मान्यवरांचे स्वागत व प्रमुख पाहुण्यांची ओळख मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम सर यांनी करून दिली व मान्यवरांचा सत्कार केला.

यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवंत व यशवंत खेळाडू तसेच विविध स्पर्धेमध्ये व परीक्षांमध्ये उज्वल यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
Back to top button
कॉपी करू नका.