फलटण प्रतिनिधी आस्था टाईम्स दि. १८ : गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्था संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून संस्थेच्या चेअरमनपदी के. बी. ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर व संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन बबनराव यादव यांची चेअरमनपदी फेर निवड झाली असून, व्हा. चेअरमन पदी योगेश रघुनाथ यादव यांची निवड झाली आहे. संचालक पदी संदीप मोहनराव शिंदे, गणेश हणमंतराव निकम, हेमंत बाळासाहेब खलाटे, अशांत हनुमंत साबळे, ॲड. संदीप राजू लोंढे यांची निवड झाली आहे.
संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण जे. पी. गावडे यांचे मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी वर्ग १ शेखर साळुंखे यांनी पार पाडली.
संचालक मंडळावरील ७ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर साळुंखे यांनी जाहीर केले व वरील ७ जणांची संचालक मंडळावर निवड झाल्याचे जाहीर केले.
चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीसाठी बोलाविण्यात आलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळ बैठकीत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, चेअरमन पदी संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन बबनराव यादव आणि व्हा. चेअरमन पदी योगेश रघुनाथ यादव यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर साळुंखे यांनी जाहीर केले.
संचालक मंडळ ५ वर्षांचा कार्यकाळ संपल्याने पुढील ५ वर्षांसाठी म्हणजे सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी वरील प्रमाणे संचालक मंडळ बिनविरोध निवडून देण्यात आले असून त्यानंतर चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीही एकमताने बिनविरोध पार पडल्याचे के. बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक हेमंत खलाटे यांनी सांगितले.
सर्व संचालक मंडळ व के. बी. ग्रुप ऑफ कंपनीज व गॅलेक्सी संस्थेचे कर्मचारी यांचेवतीने नवनिर्वाचित सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
के. बी. ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर आणि एक यशस्वी उद्योजक सचिन बबनराव यादव यांनी के. बी. उद्योग समूहात कार्यरत असणाऱ्या १५०० कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा सखोल आणि सकारात्मक अभ्यास करुन सर्वसामान्य कर्मचारी यांना आर्थिक सहाय्य केल्यास छोट्या मोठ्या व्यवसायातून ते आपली आर्थिक परिस्थिती सुधारु शकतात असा विचार करुन ५ वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रात गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली व त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना अर्थ सहाय्य करण्यास सुरुवात केली. सुरुवातीस तालुका कार्यक्षेत्र असणारी संस्था अल्पावधीतच तालुक्यातील दोन संस्थांचे गॅलेक्सी संस्थेत विलीनीकरण करुन संस्थेने सातारा व पुणे जिल्हा कार्यक्षेत्र प्राप्त केले व सदरचे दोन्ही जिल्ह्याचे कार्यक्षेत्र प्राप्त झाल्याने शाखा विस्तार करुन आज संस्थेच्या एकूण ६ शाखा अद्यावत व सुसज्ज उभारुन कार्यान्वित झाल्या आहेत. चालू आर्थिक सालात माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी अद्ययावत नवीन शाखा स्थापन केली व त्या नवीन शाखेत कुशल अनुभवी तसेच उच्चशिक्षित ५० कर्मचाऱ्यांची पुणे, मुंबई या महानगरीतून नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्था स्थापनेपासून सभासदांना मुदत ठेवीवर रास्त व्याजदर देऊन चालू आर्थिक वर्षात ७५ कोटींचा एकत्रित व्यवसाय करुन एक नवीन उच्चांक प्रस्थापित करताना जिल्ह्यातील इतर संस्थांपुढे आदर्श ठेवला आहे.
सभासदांना उद्योग व्यवसाय वाढीसाठी कर्ज वितरण करुन संस्थेचा एन.⁰पी.ए. २% पेक्षा कमी ठेवण्यात संस्थेने यश मिळवले आहे. तसेच सोने तारणास जास्तीत जास्त कर्ज पुरवठा माफक व्याजदर व मशीनद्वारे सोने ऐवजाची शुद्धता तपासून ग्राहकांना १५ मिनिटात कर्ज अदा करण्यात येत असल्याने सभासद ग्राहकांचा संस्थेस उदंड प्रतिसाद मिळत आहे. संस्थेने स्थापनेपासून सभासद हित जोपासून तसेच तत्पर सेवा प्रदान करुन आणि सर्व आर्थिक व्यवहार अतिशय पारदर्शक ठेवून ग्राहकांना उत्तम सेवा दिली असल्याचे संचालक हेमंत खलाटे यांनी आवर्जून सांगितले.
फोटो : नवनिर्वाचित चेअरमन सचिन यादव यांचे अभिनंदन करताना के. बी. ग्रुप मधील कर्मचारी शेजारी सौ. सुजाता यादव व अन्य कर्मचारी.
Back to top button
कॉपी करू नका.