गया (बिहार) : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील खो-खो मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशभरात आपला ठसा उमटवला आहे. गतविजेत्या महाराष्ट्राच्या मुलांनी सातव्यांदा सलग सुवर्ण पदक पटकावत इतिहासाची पुनरावृत्ती केली, तर मुलींच्या संघाला अंतिम फेरीत ओडिशाकडून पराभवाचा सामना करत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दोन्ही सामन्यात महाराष्ट्राला ओडिशा बरोबर लढत द्यावी लागली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी सलग ७ वे सुवर्णपदक मिळवत मैदानावर धमाका केला. तर महाराष्ट्राच्या मुलींनी या आधी पाच सुवर्ण पदक मिळवली होती तर हे दुसरे रौप्य पदक आहे.
मुलांच्या लढतीत महाराष्ट्राचा ओडीशावर वर्चस्व गाजवणारा विजय !

मुलांच्या विभागात महाराष्ट्राने ओडिशाला ३४-२५ असा ९ गुणांनी धुव्वा उडवत मैदानावर राज जाधवच्या कर्णधार पदाखाली वर्चस्व गाजवले. महाराष्ट्राच्या हारदया वसावे (२ मि. नाबाद संरक्षण व २ गुण), आशिष गौतम (१.४६ मि. संरक्षण व ६ गुण), राज जाधव (१.१४ मि. संरक्षण व २ गुण), शरद घाटगे (८ गुण) यांनी मैदान दणाणून सोडणार खेळ करत महाराष्ट्राला सलग ७ वे सुवर्ण पदक मिळवून दिले. तर पराभूत ओडिसातर्फे यशवंत यादव (१.०८, १.०१ मिनिटे संरक्षण व २ गुण), शगु सोयान (१.०८, १.२८ मि. संरक्षण व ४ गुण), सुमित पात्रा (१.५० मि. नाबाद संरक्षण व १० गुण), सुमित साहू (१.०९ मि. संरक्षण) दिलेली जोरदार लढत अपयशी ठरली.
मुलींच्या अंतिम सामन्यात चुरस, ओडिशाचा विजय

मुलींच्या गटात महाराष्ट्र-ओडिशा हे दोन्ही संघ बलाढ्य असल्यामुळे अंतिम सामना चुरशीचा झाला. या सामन्यात ओडिशाने महाराष्ट्राला ४४-३१ असे ३ गुणांनी पराभूत केले व महाराष्ट्राला उपविजतेपदावर समाधान मानावे लागेल. या सामन्यामध्ये ओडिशा कडून अर्चना प्रधान (१.३० मि. नाबाद, २ मि. संरक्षण व २ गुण), स्मरणिका साहू (१.०२ , १.४७ मि. संरक्षण व १२ गुण), हरप्रिया भुयान (१.१३, १.१० मि. संरक्षण), के रमया (६ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. तर महाराष्ट्राकडून सुहानी धोत्रे (१, १ मि. संरक्षण व ८ गुण), अमृता पाटील (१.४० मि. संरक्षण व १२ गुण), प्रतिक्षा बिराजदार (१.०८, १.२० मि. संरक्षण), अश्विनी शिंदे (६ गुण) यांनी जोरदार लढत दिली होती. काही वेळेला महाराष्ट्र कि ओडिशा असा संभ्रम निर्माण झाला होता पण अखेर ओडिशाने विजयश्री खेचून नेली.
संघाची कामगिरी अभिमानास्पद
या विजयासह महाराष्ट्राच्या मुलांनी सलग सातव्या सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. हे केवळ एक पदक नव्हे तर राज्याच्या खो-खो परंपरेचा अभिमान आहे. महाराष्ट्राच्या मुलींसाठी हे दुसरे रौप्य असून त्यांनी याआधी पाच सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
शाब्बास महाराष्ट्र!
खो-खोच्या मैदानावर महाराष्ट्राने पुन्हा एकदा सिद्ध केले की, क्रीडा कौशल्य, चिकाटी आणि संघभावना यांच्या जोरावर सातत्याने यश मिळवता येते. या यशामागे प्रशिक्षक, खेळाडू, संघटन आणि राज्य क्रीडा यंत्रणेचे अविरत परिश्रम आहेत.
Back to top button
कॉपी करू नका.