ताज्या घडामोडी

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटणमध्ये अत्याधुनिक एआय प्रयोगशाळा उभारणार : विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार थेट फायदा : श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर

फलटण  आस्था टाईम्स वृत्तसेवा  : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण आणि पुणे येथील नामांकित ए आय ऑटोमेशन (AI Automaton) प्रा. लि. यांच्या मध्ये आज पुणे येथे एक ऐतिहासिक सामंजस्य करार (Mou) संपन्न झाला. या करारांतर्गत फलटण येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून, या प्रयोगशाळेचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच फलटण परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार असल्याचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
या करारासाठी आयोजित कार्यक्रमात ए आय ऑटोमेशनचे (AI Automaton) मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण मुधियन, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. मनोजकुमार दळवी, AI & DS विभागप्रमुख प्रा. अमित टी. भोसले, आणि महाविद्यालय मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. गोविंद ठोंबरे उपस्थित होते.

आजचा दिवस आमच्यासाठी मैलाचा दगड आहे. एआय ऑटोमेशनचे (AI Automaton) सोबतच्या या करारामुळे आमच्या विद्यार्थ्यांना AI, ML, डेटा सायन्स, NLP, रोबोटिक्स यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण मिळणार आहे. यामुळे केवळ शैक्षणिक कौशल्यच नव्हे तर इंडस्ट्री-ओरिएंटेड स्किल्सही विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतील असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी केले आहे.
ग्रामीण भागात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या आमच्या उद्दिष्टाला आज दिशा मिळाली आहे. आम्ही विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहोत, जे त्यांना करिअरमध्ये स्पर्धात्मक बनवेल असा विश्वास एआय ऑटोमेशनचे (AI Automaton) सीईओ भूषण मुधियन यांनी व्यक्त केला आहे.
या प्रयोगशाळेमुळे शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. पिकांवरील रोग, कीड, माती परीक्षण, हवामान विश्लेषण यासाठी एआय (AI) आधारित समाधान उपलब्ध होणार आहे. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन पिक संगोपन करुन उत्पादनात वाढ करु शकतील. कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणला याचा थेट फायदा होणार असून, शेतमाल व्यवस्थापन व वितरण प्रक्रियेत नवे तंत्र लागू करता येणार असल्याचे यावेळी आवर्जून सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी नव्या संधी उपलब्ध होणार असून, कॅम्पस प्लेसमेंटसाठी उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांच्या आधारे कंपन्यांमध्ये थेट रोजगार मिळण्याची शक्यता वाढणार असल्याचे निदर्शनास आणून देत या ऐतिहासिक कराराबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.
एआय (AI) प्रयोगशाळेमुळे केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनही सुलभ होणार आहे. शिक्षणासोबतच समाजातील प्रश्न सोडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा आमचा उद्देश असल्याचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
या प्रयोगशाळेमुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला लाभ होईल असे प्रतिपादन बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
सदर प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी, विभाग प्रमुख व सर्व प्राध्यापकांचे कौतुक करताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, ही प्रयोगशाळा हे महाविद्यालय आणि फलटणचे अभिमानाचे पाऊल आहे.
हा सामंजस्य करार फक्त प्रयोगशाळा उभारण्यापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाची दिशा आहे, त्यामुळे ही भागीदारी भविष्यात अनेक नवे प्रयोग, संशोधन, स्टार्टअप्स व ग्रामीण भागातील समस्यांवर आधारित तंत्रनियंत्रित उपायांचा पाया ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.